महाआघाडी सरकाने निर्विवाद वर्ष पूर्ण केले हे विरोधकांचे दुखणे !

मुंबई  : पोलिसनामा ऑनलाईन – भाजप सत्तेवर असताना त्यांचे आपापसात नेहमीच वाद होते. एक व्यक्तीच्या अहंकारामुळे ज्येष्ठ नेत्यांना घरी बसावे लागले किंबहुना पक्ष सोडावा लागला. त्यामुळे सरकारमधील तीन पक्षात वाद आहे असे बोलण्याचा भाजपला अधिकार नाही. सरकार उत्तमपणे चालवत असून मंत्र्यांनी जादा निधीची मागणी करणे म्हणजे वाद नव्हे. आघाडी सरकारने निर्विवादपणे एक वर्ष पूर्ण केलं हेच विरोधकांचे दुखणे असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस आज अडचणीत असेल पण प्रत्येक क्षेत्रात लगेच समानता येते असे नाही थोडा उशीर होतो. काँग्रेसचा सर्वाना समान न्याय मिळवून देण्याचा विचार शाश्वात आहे. तो सर्वाना पुढे नेहणारा आहे. आम्ही किमान समान कार्यक्रमावर एकत्रित आलो. आघाडी सरकार बनले नसते तर भाजपने राज्यातही विभाजनवाद तसेच दहशत, भेदाचे राजकारण सुरू केले असते. त्यामुळे आम्ही त्यांना एक वर्ष सत्तेपासून दूर ठेवले आहे

५ पाच ११२ कोटी ७७ लाखाचे उत्त्पन्न
अगदी सरकारची सुरुवातच कोरोनाच्या संकटाने झाली. त्यातच नैसर्गिक संकटे आहेच. राज्यात काही ठिकाणी ओला दुष्काळ तर काही ठिकाणी महापूर आले. अशा परिस्थितीमध्ये स्टँप ड्युटी मध्ये सवलत दिली. त्याचा राज्याची तिजोरी व जनतेला फायदा झाला. १ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत आम्ही ५ लाख १९ हजार ३७३ दस्तांची नोंदणी केली, त्यापोटी ६,५४२ कोटी ७० लाख रुपये राज्याला उत्पन्न मिळाले. याच काळात यावर्षी आम्ही तब्बल लाख २२ हजार ३४८ दस्तांची नोंदणी केली व ५,११२ कोटी ७७ लाखांचे उत्पन्न मिळवले. याचा सरळ अर्थ जवळपास २ लाख लोकांना या योजनेचा फायदा झाला. सरकारलाही उत्पन्न मिळाले. हा या वर्षातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय ठरला, असेही थोरात यांनी सांगितले .

सरकार कुुठेही कमी पडलेलेे नाही
सध्या विरोधकांना काही काम उरले नाही. कर्जमाफी केली. दोन लाखांपर्यंतचे पैसे विनासायास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. चक्रीवादळामुळे झालेले पिकांचे नुकसान, पूर्व विदर्भातील महापूर या सगळ्या परिस्थितीवर दहा हजार कोटींचे पॅकेज दिले. शहरांसाठी कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग ही कामे आम्ही बंद ठेवली नाहीत. परिणामी लोकांना काम मिळू लागले. लोकांच्या हातात पैसा आला, तो बाजारात आला कठीण काळातसुद्धा सरकार तिथे कमी पडले नाही. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला काही अर्थ उरत नाही.

पृथ्वीराज चव्हाण यांना डावलले जात आहे का ?
विधानसभेचे अध्यक्षपद जर पृथ्वीराज चव्हाण स्वीकारणार असतील, तर त्याला आमची तयारी आहे, असे राष्ट्रवादीने स्पष्ट केले होते. याबाबतची एक बैठक पृथ्वीराज चव्हाण यांच्यात मुंबईतील कार्यालयात आम्ही सगळ्या नेत्यांनी घेतली होती. मात्र त्यांनीच हे पद घेण्यास नकार दिला. त्यामुळे या चर्चेला अर्थ नाही. आजही अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही त्यांच्याशी चर्चा करूनच घेतो. मी किंवा अशोक चव्हाण; आम्ही दोघेही सतत त्यांच्या संपर्कात असतो. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना डावलले जाते असे म्हणणे चुकीचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.