Coronavirus : ‘कोरोना’नं पैसे वाचवण्यासाठी दिले ‘हे’ 5 धडे, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त देशांच्या आर्थिक स्थितीत मोठा फरक पडल्याचे दिसून येत आहे. मात्र या करोना संकटाने नोकरदारांना अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. किंबहुना त्या शिकायला भाग पाडलं आहे. पगार जास्त असल्यामुळे गरज नसताना काही गोष्टींची खरेदी केली जाते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पैसा हातात येणेच बंद झाले तर ? विचार केला तरी भीती वाटते ना ? चला तर मग आपल्या पैशाचे योग्य नियोजन कसे केलं जाईल याबाबत माहिती घेऊया …

१) आरोग्य विमा महत्वाचा

केवळ कोरोनासारखे संकट आहे म्हणून नाही तर नेहमीच आरोग्य विमा महत्वाचा असतो. आरोग्यासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास आर्थिक सहाय्य करणारा विमा महत्वाचा ठरतो. पण कंपनीने आरोग्य विमा दिलेला असल्यामुळे बहुतांश कर्मचारी वेगळा विमा घेणे किंवा या विम्याची मर्यादा वाढवणं टाळतात. या परिस्थितीमुळे आता विम्याचं महत्त्व कळायला लागलं आहे.

२) जास्त कर्ज घेणे धोक्याचे

क्षमता नसेल तर कर्ज हे तुमच्यासाठी मोठं संकट ठरू शकतं. अनेकांना क्रेडिट कार्डवर खर्च करण्याची सवय असते आणि पगार झाल्यानंतर क्रेडिट कार्डचं बिल भरलं जातं. पण सध्याची वेळ ही धडा देणारी आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना नोटीस न देताच काढून टाकत आहेत. त्यामुळे ज्यांच्यावर कर्ज आहे, त्यांची चिंता वाढत आहे. म्हणूनच आपल्या क्षमतेएवढाच खर्च करण्याचं नियोजन आवश्यक आहे.

३) मासिक बचत करणे

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला फारशी अडचण येत नाही. विशेषतः करोनासारख्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे पुरेशी बचत असेल तर घरात राहूनही तुम्ही काही दिवस स्वतःच्या गरजा भागवू शकता. अचानक नियमित उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्यानंतर ही बचत तुमच्यासाठी संजीवनी देणारी ठरते. किमान आपल्या सहा महिन्यांची गरज भागू शकेल, एवढी बचत करणं आवश्यक आहे. विशेषतः नोकरदारांसाठी ही अत्यंत महत्त्वाचं आहे.

४) गुंतवणुकीत विविधता

करोना विषाणूमुळे शेअर बाजार, रोखे, बँका, पोस्ट, धातू, स्थावर मालमत्ता आदी गुंतवणूक पर्यायांवर सकारात्मक आणि विपरीत असे परिणाम सध्या झाले आहेत. अशामुळे आपली गुंतवणूक अर्थात ज्यांनी विभागून केली असेल त्यांना साहजिकच काळजी वाटू शकते. पण, गुंतवणूक विभागून करणे हाच योग्य पर्याय आहे आणि याबाबत अनेक वेळा बोलले गेले आहे. कारण, एखाद्या गुंतवणूक पर्यायात मिळालेला परतावा हा तत्क्षणी फायद्याचा वाटत असला, तरी त्याचा उपयोग किती होतो हेही पाहणे आवश्यक आहे. पण, कोणत्याही प्रकारात केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, प्रत्येक गुंतवणुकीला काही मर्यादा आहेत, हे आपल्याला समजून घ्यायला हवे. म्हणून गुंतवणूक विभागून करायची नाही, असे नाही. कारण यातूनच आपल्याला गुंतवणुकीत समतोल राखता येणार आहे.

५) पोर्टफोलिओ संतुलन महत्त्वाचे

जाणकारांच्या मते, एसआयपीच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करावी. मालमत्तावाटपाला (अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन) महत्त्व दिले पाहिजे. इक्विटी, डेट, रिअल इस्टेट यांजबरोबर सोने ही वस्तू गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केली पाहिजे. पोर्टफोलिओ संतुलनाला महत्त्व द्या. उदाहरणार्थ, आधीचे आपले पोर्टफोलिओ वाटप ७० टक्के इक्विटी व ३० टक्के डेट असे होते. सध्याच्या पडझडीमुळे ते ५० टक्के इक्विटी आणि ५० टक्के डेट झाले आहे. पुढील दहा वर्षांचा कालावधी डोळ्यांसमोर ठेवून आपल्या जोखमीला साजेशा स्कीममध्ये गुंतवणूक करावी व परत पोर्टफोलिओ ७० टक्के इक्विटी आणि ३० टक्के डेट या प्रमाणात आणावा, असं जाणकार सांगतात.