‘पोलीसनामा’ इफेक्ट : घनकचरा विभागातून पैठणकर यांची ‘उचलबांगडी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – निलंबित केल्यानंतर चौकशी चालू असतानाच घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. नानासाहेब पैठणकर यांना आयुक्तांनी पुन्हा घनकचरा व्यवस्थापन विभागात हजर केले होते. या नियुक्तीला ‘पोलिसनामा’ने सर्वप्रथम हरकत घेतली होती. तो मुद्दा नगरसेवकांनी महासभेत लावून धरला होता. शिवसेनाही आक्रमक झाली होती. त्यामुळे पैठणकर यांची काल घनकचरा व्यवस्थापन विभागातून बदली करण्यात आली असून, त्यांना आरोग्य विभागात नियुक्ती देण्यात आली आहे.

पैठणकर यांची नियुक्ती कशा पद्धतीने चुकीची आहे, याबाबतचे सविस्तर वृत्त ‘पोलीसनामा’ने प्रसिद्ध केले होते. डॉ. पैठणकर यांनी कामात अक्षम्य हलगर्जीपणा केल्यानेच जिल्हाधिकारी तथा पत्कालीन प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी निलंबनाची कारवाई केलेली होती. मात्र आयुक्तांनी अवघ्या 1 ते दीड महिन्यात त्यांना पुन्हा कामावर घेत त्याच पदावर नियुक्ती दिली. ही बाब बेकायदेशीर आहे. डॉ. पैठणकर यांनी या विभागात अनेक घोटाळे केलेले आहेत. त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती देवून पुरावे नष्ट करण्याची संधी दिली आहे, असा आक्षेप सर्वप्रथम ‘पोलीसनामा’ ने उपस्थित केला होता.

‘पोलीसनामा’ने पैठणकर यांच्या नियुक्तीवर घेतलेला आक्षेप इतर नगरसेवकांनी उचलून धरला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही त्यावरून गोंधळ झाला. शिवसेनाही त्यात सहभागी झाली. अखेर घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख पैठणकर यांची घनकचरा व्यवस्थापन विभागातून आरोग्य विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश काल दुपारी काढण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –