पाकचा निर्लज्जपणा सुरु – म्हणे पुलवामामध्ये ‘जैश’चा हात नाही

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – एकीकडे भारतासमोर शांततेचा प्रस्ताव ठेवून साळसुदपणाचा आ जरी आणला जात असला तरी पाकिस्तानचा निर्लज्जपणा पुन्हा सुरुच आहे. पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे सबळ पुरावे दिल्यानंतरही या हल्ल्यामागे जैशचा हात असू शकत नाही असा दावा पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. त्यासोबतच कुख्यात दहशतवादी मसुद अजहरचा बचाव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद संघटनेने स्विकारली असली तरी त्या संघटनेने हे कृत्य केले नाही. आमच्या निकटवर्तीयांनी जैश ए मोहम्मदकडे विचारणा केली मात्र त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. असे त्यांनी सांगितले. मात्र कुणी संपर्क साधला हे सांगितले नाही.

पाकिस्तावर दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी भारताने व आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव वाढत आहे. मसूद अझर पाकिस्तानमध्ये लपून बसलेला आहे. एकीकडे पाकिस्तान शांततेसाठी प्रस्ताव दिल्याच्या गप्पा मारत आहे. मात्र दुसरीकडे जैश ए मोहम्मदची पाठराखण करत आहे. त्यामुळे पाकिस्तानचा दुटप्पीपणा समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मसूद अझरवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढविला जात आहे.