दोन्ही देशातील तणाव चर्चेतून कमी करू – पाकिस्तान खासदार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू – काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील हिंदू खासदार रमेश कुमार वाखवानी यांनी भारत-पाकिस्तान दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांनी हातमिळवणी केली तर भारताला त्याचा जास्त फायदा होईल असे त्यांनी सांगितले आहे. रमेश कुमार वाखवानी पाकिस्तानातील सत्ताधारी इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे खासदार आहेत.

तसेच त्यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी  करण्याची  तयारी दर्शवली आहे. दोन्ही देश कुठल्याही आरोप-प्रत्यारोपत न अडकता शांतता आणि समृद्धीच्या मार्गावर चालतील अशी अपेक्षा वाखवानी यांनी व्यक्त केली आहे. कुंभ मेळ्यासाठी ते भारतात आले आहेत. दोन्ही देशांनी परस्पराविरुद्ध आपल्या भूमीचा कोणालाही वापर करु देऊ नये, तसेच  हातमिळवणी झाली तर भारतालाच त्याचा जास्त फायदा होईल असे ते म्हणाले.

सध्याची परिस्थिती आम्हाला नको आहे. तुमचे काही विचार,शंका असतील तर मला सांगा. मी ते माझ्या सरकारपर्यंत पोहोचवेन. मी स्वत:हा याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबर चर्चा करेन असेही म्हटले आहेत.

You might also like