COVID- 19 : पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत 209 लोकांचा मृत्यू, अफगणिस्तानमध्ये अडकलेले 490 नागरिक परतले

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  जगभरातील देशांनी कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केले आहे. लॉकडाऊनमुळे पाकिस्तानचे नागरिक अफगाणिस्तानात अडकले होते. अफगाणिस्तानात तोरखम सीमेवरुन 92 महिलांसह किमान 492 पाकिस्तानी लोकांना मायदेशी परत पाठविण्यात आले आहे. डॉन यांनी अधिकार्‍यांच्या हवाल्यामार्फत सांगितले की, इतर 111 अडकलेल्या मुलांना सुद्धा आपल्या आई-वडिलांसोबत पाकिस्तानामध्ये जाण्याची परवानगी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परत आलेल्या 492 पैकी 470 जणांना लांडी कोटल येथील क्वारंटाईन सेंटर आणि 22 जणांना जमरूड येथील शाह कास सेंटर येथे पाठविण्यात आले आहे. यापैकी कोरोना विषाणूची लक्षणे असलेल्या एका व्यक्तीला लांडी कोटल येथील जिल्हा रुग्णालयाच्या अलगाव वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे 16 मार्च रोजी सीमा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तानात अडकलेल्या 1,205 नोंदणीकृत लोक तोरखम सीमेमार्गे पाकिस्तानात परत आले आहेत.

उपायुक्त कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अफगाणिस्तानासह एकूण 1,318 लोकांना खैबर जिल्ह्यातील विविध केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 43 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे आणखी 17 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर एकूण मृत्यूंची संख्या 209 वर गेली आहे. त्याचबरोबर, बुधवारी कोविड -19 च्या 533 नवीन घटना घडल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 9,749 वर पोचली आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कोरोना विषाणूमुळे 4,328, सिंधमध्ये 3,053, खैबर-पख्तूनख्वामध्ये 1,345, बलूचिस्तानमध्ये 495, गिलगीट बाल्टिस्तानमध्ये 284 इस्लामाबाद 194 आणि गुलाम काश्मीरमध्ये 53 पेक्षा जास्त रुग्णांमध्ये संक्रमणाची पुष्टी झाली आहे.