पाकिस्ताननं पुन्हा पलटी मारली, म्हणालं – ‘आमच्या देशात नाही अंडरवर्ल्ड ‘डॉन’ दाऊद इब्राहिम’

नवी दिल्ली : पाकिस्तान नेहमी प्रमाणे आपल्याच वक्तव्यावरून पलटी मारली आहे. पाकिस्तानने शनिवारी दहशतवादी संघटनांच्या 88 प्रमुखांविरूद्ध प्रतिबंध लावण्यासंबंधी घोषणा करताना ही गोष्ट मान्य केली होती की, मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीतच आहे. शिवाय त्याच्यावर प्रतिबंध लावण्याची घोषणा केली होती. मात्र, आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, दाऊद इब्राहिम त्यांच्या देशात नाही.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत वक्तव्य जारी करून येथे दाऊद इब्राहिम असल्याचे पुन्हा नाकारले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले जात आहे की, आम्ही नवीन प्रतिबंध लावत आहोत. हे सर्व रिपोर्ट चुकीचे आहेत. भारतीय मीडियात दावा केला जात आहे की, पाकिस्तानने आपल्या देशातील काही सूचीबद्ध व्यक्ती असल्याचे (ज्यामध्ये दाऊद सुद्धा सहभागी आहे) म्हटले आहे. हा रिपोर्ट निराधार आहे.

शनिवारी पाकिस्तानी मीडियाच्या संदर्भाने वृत्त आले होते की, अंतरराष्ट्रीय दशहतवादावर देखरेख करणारी संस्था एफएटीएफच्या ‘ग्रे लिस्ट’ मधून बाहेर येण्याच्या प्रयत्नांतर्गत पाकिस्तानने 88 प्रतिबंधित दहशतवादी संघटना आणि हाफिज सईद, मसूद अजहर आणि दाऊद इब्राहीमसह त्यांच्या प्रमुखांना कडक आर्थिक प्रतिबंध लावले आहेत.

या वृत्तानुसार या दशहतवादी संघटना आणि त्यांच्या प्रमुखांची सर्व संपत्ती जप्त करणे आणि बँक खाती सील करण्याचे आदेश दिले आहेत. पॅरिस येथील एफएटीएफने जून, 2018 मध्ये पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकले होते आणि इस्लामाबादला 2019 च्या अखेरपर्यंत कार्ययोजना लागू करण्यास सांगितले होते. परंत, कोविड-19 महामारीमुळे हा कालावधी वाढवण्यात आला होता.

सरकारने 18 ऑगस्टला दोन अधिसूचना जारी करत 26/11 मुंबई हल्ल्याचा कट रचणारा आणि जमात-उद-दावाचा प्रमुख सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख अजहर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमवर प्रतिबंधाची घोषणा केली होती. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द न्यूज’ च्या वृत्तानुसार पाकिस्तान सरकारने नुकतीच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) द्वारे जारी नव्या नियमावलीचे पालन करत दहशतवादी संघटनांच्या 88 प्रमुखांवर आणि सदस्यांवर प्रतिबंध लावले आहेत.