आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीतील उड्डाणांना दिली पाकिस्तानने परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत पाकिस्तानमधील तणाव वाढल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या एअर स्ट्राइकमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने बुधवारी आपल्या हवाई हद्दीतील उड्डाणांना बंदी घातली होती. त्यानंतर एअर इंडियाने पर्यायी मार्गांबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र, वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतील विमान उड्डाणांना परवानगी दिली आहे. त्यामुळे हवाई सेवा पूर्ववत होत आहेत.

भारताबरोबर वाढलेल्या तणावानंतर पाकिस्तानने बुधवारी इस्लामाबाद, लाहौर आणि कराचीसह प्रमुख विमानतळावरील व्यापारी हवाई उड्डाणे अनिश्चित काळासाठी बंद केल्याचे जाहीर केले होते. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारताचे चार प्रवासी लाहौर विमानतळावर अडकले होते. पाकिस्तान एअरलाइन्सचे पीके 270 हे विमान बुधवारी लाहौरहून नवी दिल्लीकडे रवाना होणार होते. मात्र, हवाई हद्दीतील उड्डाणाच्या बंदीमुळे त्याचे उड्डाण झाले नाही. त्यामुळे भारताचे चार प्रवासी अल्लामा इकबाल विमानतळावरच अडकले होते. उड्डाणे पूर्ववत होईपर्यत एखाद्या ठिकाणी आपली व्यवस्था करण्याची विनंती या प्रवाशांनी अधिकाऱ्यांना केली होती. वाढत्या तणावामुळे भारतातील  काही विमानतळावरही हवाई उड्डाणांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सुमारे 65 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यात काही आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचाही समावेश आहे. दिल्ली विमानतळाहून 47 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. श्रीनगर, जम्मू, अमृतसर, देहरादून, लेह, पठाणकोट आणि सिमलासह इतर विमानतळावरील वाहतूक बंद असल्याने मुंबईहून 16 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दिल्लीतील रद्द झालेल्या विमान उड्डाणांमध्ये 25 विमाने दिल्लीतून उड्डाण करणार होती. तर 22 विमाने या विमानतळावर उतरणार होती.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत -पाकिस्तानमधील तणाव लवकरच संपणार असल्याचे संकेत दिल्यानंतर काही वेळानंतर पाकिस्ताने हवाई हद्दीतील उड्डाणांना परवानगी दिली आहे. त्यामुळे जगभरात विविध ठिकाणी अडकलेले प्रवासी इच्छीत स्थळी प्रवास करू शकणार आहेत. पाकिस्तानच्या या निर्णयानंतर हवाई सेवा पूर्ववत होत आहेत.