PAK ची वाटचाल पुन्हा ‘लष्करी राजवटी’कडे ? माजी राजदूत म्हणाले – ‘मार्शल लॉ’ ची फक्त घोषणाच बाकी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच आहे. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत 1 लाख 42 हजार कोरोनाचे रुग्ण येथे आढळले असून 2,663 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे इमरान खान सरकार कोरोना साथीच्या आजाराला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. देशाचे माजी डिप्लोमॅट वाजिद शम्स-उल-हसन यांच्या म्हणण्यानुसार लष्कर सरकारच्या या कामावर नाराज आहे. अनेक उच्चपदस्थ लष्करी अधिकारी वरिष्ठ पदावर नियुक्त करण्यात आले आहेत. आता देशात फक्त मार्शल लॉ च्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

लेफ्टनंट जनरल प्रशासकीय पदांवर
वाजिद हे सध्या पत्रकारितेत आले आहेत. न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना वाजिद म्हणाले की, ‘कोरोना विषाणू साथीला रोखण्यासाठी इमरान खान सरकारला आलेल्या अपयशामुळे लष्कर नाखूष आहे. परिणामी, 12 पेक्षा अधिक लेफ्टनंट जनरल प्रशासनात वरिष्ठ पदावर नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यापैकी काहींची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि काहींची होणार आहे. तथापि, अद्याप मार्शल लॉची औपचारिक घोषणा झालेली नाही. सरकारी एअरलाईन्स पीआयए आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या प्रमुख संस्थांचे नेतृत्व लष्करी अधिकारी करतात. हे सर्व फक्त दोनच महिन्यांत घडले.’

इमरान खान यांना काहीही माहित नाही
दरम्यान वाजिद म्हणाले की, कोरोना विषाणू साथीचा सामना कसा करावा हे पंतप्रधान इमरान खान यांना माहित नाही. ते म्हणाले, ‘सिंध सरकारने लॉकडाऊनची मागणी केली होती मात्र इमरान खान यांनी त्याचा विरोध केला. त्यानंतर जेव्हा तेथील परिस्थिती अधिकच बिकट झाली तेव्हा त्यांनी स्मार्ट लॉकडाउनबद्दल बोलण्यास सुरूवात केली. सरकारी आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 30 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

इमरान खान डब्ल्यूएचओचे देखील ऐकत नाही
डब्ल्यूएचओने चेतावणी दिली होती की कोरोना विषाणू पाकिस्तानमध्ये अधिक प्रमाणात पसरू शकतो. यासाठी कडक लॉकडाऊन लागू करणे आवश्यक होते. तथापि, इमरान खान म्हणतात की देशाची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. जर लॉकडाऊन वाढवले तर लोक उपाशी मरतील. त्यांनी देशातील डॉक्टरांचे देखील काही ऐकले नाही, असे वाजिद यांनी सांगितले.

सरकार असे कार्य करते
वाजिद म्हणाले की, इमरान सरकार अनेक लहान पक्षांसोबत काम करत आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व पक्ष लष्कराच्या नेतृत्त्वाखाली काम करतात. जर पाकिस्तानात कुणी सर्वात शक्तिशाली असेल तर ते फक्त लष्कर आहे. खरं तर लष्कराची भूमिका इथे काही नवीन नाही. सुरुवातीपासूनच पाकिस्तानमध्ये हे चालत आले आहे. मागील सरकारांनीही असेच केले आहे.

पाकिस्तानातील राष्ट्रपती झालेले लष्करशहा –
अयूब खान यांचा कार्यकाळ – 1958-69
याहना खानचा कार्यकाळ – 1969-71
जिया उल हक यांचा कार्यकाळ – 1977-88
परवेझ मुशर्रफ यांचा कार्यकाळ – 2001-08