24 ताससुद्धा युद्ध लढू शकणार नाही पाकिस्तानचे लष्कर : फजलुर रहमान

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन-  पाकिस्तानमध्ये लष्कराबाबतच्या एका वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. इम्रान खान यांच्या सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी हे जमीयत उलेमा-ए-इस्लामचे मौलाना फजलुर रहमान यांच्या त्या वक्तव्यावर भडकले ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, पाकिस्तानचे लष्कर 24 ताससुद्धा युद्ध लढू शकणार नाही.

मौलाना फजलुर रहमान पाकिस्तानच्या सरकारविरूद्ध मोठ्या कालावधीपासून आंदोलन करत आहेत आणि इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता त्यांनी लष्कराबाबत तिखट वक्तव्य केले आहे. इम्रान खान यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले फवाद चौधरी यांनी मौलाना यांच्या टिप्पणीला दहशवादाविरूद्ध युद्धात आणि मातृभूमीच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या शहीदांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

डॉनच्या वृत्तानुसार, फवाद चौधरी यांनी म्हटले की, राजकीय कारणांमुळे राष्ट्रीय संस्थांवर हल्ला करणे निंदणीय आहे. फवाद चौधरी यांनी मौलान फजलुर रहमान यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, मौलाना फजलुर रहमान ज्येष्ठ नेते आहेत. ते कदाचित बिलावल भुत्तो-झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीत आपला ‘अपमान‘ सहन करू शकले नाहीत आणि यासाठी त्यांनी त्या मुद्द्यांवर बोलण्यास सुरूवात केली ज्यांच्याबाबत त्यांना काही माहिती नाही.

फवाद चौधरी यांनी  जमीयत उलेमा-ए-इस्लामच्या प्रमुखांनी असे बेजबाबदार वक्तव्य करू नये, असा सल्ला दिला आहे. मंत्र्यांने आठवण करून दिली की हे तेच मौलाना आहेत ज्यांनी पाकिस्तानच्या लष्कराच्या क्षमतेबाबत संशय व्यक्त केला होता आणि म्हटले होते की, तालिबान देशाच्या राजधानीच्या जवळ पोहचला आहे.