पाकिस्तान म्हणतंय – ‘भारतानं 5 राफेल आणले काय अन् 500, आम्ही तयार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलात राफेल लढाऊ विमानांचा समावेश झाल्यापासून पाकिस्तानची अस्वस्थता वाढली आहे. गुरुवारी पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा राफेलचा उल्लेख करत भारताच्या सैन्य खर्चातील वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. पाकिस्तान भारताच्या लष्करावरील खर्च आणि संरक्षण बजेटमधील वाढीबद्दल चिंताग्रस्त असल्याचे पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते जनरल बाबर इफ्तीकार म्हणाले. पण फ्रान्सकडून भारताने पाच राफेल विमान खरेदी केली असूनही सैन्य कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्याने गुरुवारी अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांबाबत बोलवलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आज पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिनही साजरा करत आहे. भारताच्या राफेल खरेदीमुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या प्रश्नावर लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटले की, भारताचा लष्करी खर्च जगात सर्वाधिक आहे आणि तो शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत सहभागी आहे.

इफ्तीकार म्हणाले, ज्याप्रकारे फ्रान्समधून भारतात राफेल पोहोचण्याच्या मार्गावर कव्हर दिला गेला, त्यावरून त्याची असुरक्षितता दिसून येते. आणि त्यांनी ५ राफेल खरेदी केली किंवा ५००, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि आम्हाला आमच्या क्षमतेबद्दल शंका नाही. आम्ही यापूर्वीही हे सिद्ध केले आहे आणि राफेलच्या येण्याने काही फरक पडणार नाही. परंतु त्यांचा संरक्षण खर्च आणि आमचे संरक्षण बजेट यातील फरक या पारंपारिक शिल्लकवर परिणाम करत आहे. जेव्हा अशा गोष्टी घडतात, तेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष दिले पाहिजे.

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने दबक्या आवाजात कमी लष्करी बजेट असल्याची तक्रारही केली. ते म्हणाले, पाकिस्तानमधील बरेच लोक म्हणतात की संरक्षण बजेट खूप जास्त आहे, सध्या आर्मी, नौदल आणि हवाई दलासह बजेटचा १७ टक्के हिस्सा सैन्यावर खर्च होतो. गेल्या १० वर्षात पाकिस्तानचे संरक्षण बजेट सातत्याने कमी होत आहे. गेल्या दोन वर्षांत संरक्षण अर्थसंकल्पातही महागाईच्या दरानुसार वाढ झाली नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, त्यामुळे आमच्या तयारीवर कोणता परिणाम झाला आहे. कमी स्त्रोत असूनही आम्ही आमच्या शत्रूंचा सामना करण्यास पूर्णपणे तयार आहोत.

इफ्तीकार म्हणाले, मग तुम्ही राफेल आणा किंवा एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा. आमच्याकडे आमची स्वतःची तयारी आहे आणि आम्ही सर्वकाही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ.

पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत काश्मीर प्रश्नावरही विधान केले आणि आपला जुना प्रचार सुरू ठेवला. काश्मीरचे लोकसंख्याशास्त्र पूर्वनियोजित पद्धतीने बदलण्याचा व तेथून मुस्लिमांना हलवण्याचा भारत प्रयत्न करत आहे, असा आरोप इफ्तीकार यांनी केला. काश्मिरींच्या अडचणी जगासमोर आणण्यात पाकिस्तानने कोणतीही कसर सोडली नाही, असे बाबर इफ्तीकार म्हणाले.

ते म्हणाले, “पाकिस्तान सरकारने काश्मीर प्रश्नावर सर्व प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून आवाज उठवला आहे. गेल्या एक वर्षात काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघात तीन वेळा उपस्थित करण्यात आला आहे, ज्यावरून जगाच्या दृष्टीने काश्मीरचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध होते. काश्मिरींची लढाई एक दिवस नक्कीच यशस्वी होईल.”

लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटले की, भारत आपले संरक्षण बजेट वाढवत आहे आणि शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत सामील झाला आहे. इफ्तिकार म्हणाले, शस्त्रास्त्रांची सर्वाधिक खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत भारत अव्वल आहे. पाकिस्तानला भारताच्या हेतू व संभाव्यतेची पूर्णपणे जाणीव आहे, पण युद्ध फक्त शस्त्राच्या आधारेच लढली जात नाहीत, तर लोकांचा विश्वास आणि देशाची इच्छा ही सैन्याची खरी शस्त्रे आहेत.

पाकिस्तानचा नवीन राजकीय नकाशा जाहीर करण्याच्या प्रश्नावर इफ्तीकार म्हणाले की, हा नकाशा आमच्या दाव्याला मान्य आहे आणि आमचा हेतू दर्शवतो. हे वादग्रस्त क्षेत्र असल्याचे पाकिस्तानने जगासमोर स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त नकाशा जाहीर केला होता, ज्यात भारताच्या काश्मीरपासून जुनागडपर्यंतचा समावेश करण्यात आला होता. भारताने ते मूर्खपणाचे पाऊल म्हणून फेटाळून लावले होते.

काश्मीर प्रकरणाबाबत सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधीलही संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, काश्मिरबाबत नेतृत्त्वासाठी सौदीने पुढे यावे अन्यथा पाकिस्तानला अन्य मुस्लिम देशांबरोबर सौदीपासून विभक्त होऊन काश्मीरच्या मुद्द्यावर बैठक घेण्यास भाग पडेल. या विधानामुळे नाराज असलेल्या सौदीला दिलगिरी व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा सौदीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

पाकिस्तान आणि सौदी यांच्यातील या तणावाबद्दलही पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्याला विचारल्यास ते म्हणाले की, इस्लामिक जगात सौदी हे केंद्र आहे याबद्दल शंका नाही आणि दोन्ही देशांमधील संबंध ऐतिहासिक होते आणि राहतील.

ते म्हणाले की, “पाकिस्तानी लोकांचे हृदय सौदीच्या लोकांशी धडधडते, त्यामुळे आमच्या संबंधांबाबत प्रश्नच उद्भवत नाही. इफ्तीकार म्हणाले की, बाजवा यांचा सौदी दौरा हा पूर्वनियोजित होता आणि त्याचा संबंध दोन्ही देशांच्या लष्करी सहकार्याशी संबंधित आहे. या दौऱ्याचा जास्त अर्थ काढण्याची गरज नाही. सर्व काही ठीक आहे.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like