‘बाबर आझम’चा खास पराक्रम, विराट कोहली-रोहित शर्मासुद्धा करू शकले नाहीत असा विक्रम, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्‍या टी -20 ब्लास्ट टूर्नामेंट मध्ये शानदार फलंदाजी करत तुफानी शतक झळकावले आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत बाबरने सर्वाधिक धावा केल्या होत्या. या सीझनमध्ये आतापर्यंत तो काही खास पराक्रम दाखवत नव्हता, परंतु बुधवारी आपल्या शानदार खेळीच्या जोरावर तो आपल्या फॉर्ममध्ये परतला. या जोरदार खेळीच्या बळावर बाबरने आपल्या नावे खास विक्रम नोंदवला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू, विराट कोहली आणि रोहित शर्मा या विक्रमाच्या आसपासही नाहीत.

या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर बाबर आझमने टी -20 कारकीर्दीत पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह, टी -20 क्रिकेटमधील सर्वात कमी डावात 5 हजार धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. बाबर आझमने पाच हजार धावा पूर्ण करण्यासाठी 145 सामने खेळले आहेत. त्याच्यापेक्षा पुढे वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल (132) आणि ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श (144) आहे ज्यांनी त्याच्यापेक्षा कमी डाव खेळत पाच हजार धावा केल्या आहेत. इतर फलंदाजांविषयी बोलायचे झाले तर अ‍ॅरॉन फिंचने 159 आणि मायकेल क्लिंगरने 162 डावात ही स्थिती गाठली आहे.

टी -20 ब्लास्टमध्ये बाबर आझमने सोमरसेट कडून खेळत ग्लॅमॉर्गन विरूद्ध अवघ्या 57 चेंडूत शतक ठोकले. बाबर आझमने या सामन्यात 62 चेंडूत 9 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 114 धावांची तुफानी पारी खेळली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 183.87 होता. या जोरावर संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ग्लॅमॉर्गनचा संघ 15.5 षटकांत 117 धावांवर ढेर झाला आणि सामना 66 धावांनी गमावला.