इम्रान खानच्या पार्टीतील नेत्याने पंजाबमध्ये येताच केली पाकिस्तानची ‘पोलखोल’, PM मोदींकडे मागितली मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे आमदार असलेले बलदेव कुमार सिंह आता पाकिस्तान सोडून भारतात परतले आहेत. पंजाबमध्ये परत आल्यानंतर त्यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार कसे केले जातात याबद्दलची कहाणी त्यांनी सांगितली.

बलदेवकुमार सिंह म्हणाले की, इम्रान खान यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, मी तिथे सुरक्षित नव्हतो. केवळ मीच नाही तर सर्व हिंदू आणि शीखही तेथे धोक्यात आहेत. जेव्हा माझ्यावर अत्याचार वाढू लागले, तेव्हा मी परत भारतात आलो. इम्रान खानने आपले कोणतेही आश्वासन पाळले नाही.

बलदेवकुमार सिंह हे पाकिस्तानच्या खैबर पख्तून ख्वा प्रांतातल्या बारिकोट आरक्षित जागेचे आमदार आहेत. बलदेव कुमार हे पंजाब, भारत राज्यात खन्ना येथे आहेत. बलदेव कुमार आपल्या कुटूंबासह पाकिस्तानातून प्राण वाचवून भारतात आले आहेत.

बलदेवकुमार यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, इम्रान खान यांनी हिंदू व शीख यांच्यासाठी काहीही केले नाही, परंतु पूर्वी 500 रुपयांमध्ये जे उपलब्ध होते ते आज 5000 मध्ये दिले जात आहे. तसेच बलदेवकुमार यांनी इम्रान खान यांना त्यांच्या नवीन पाकिस्तानबाबत शुभेच्छा सुद्धा दिल्या.

बलदेवकुमार यांनी सांगितले की,पाकिस्तानात सध्या प्रत्येक जण परेशान आहे मग तो बहुसंख्यांक असो वा अल्पसंख्यांक. इम्रान खान हे तेथील चोर लोकांना सोबत घेऊन राज्य करत आहेत. तसेच बलदेव कुमार यांनी यावेळी नरेंद्र मोदींना पाकिस्तानातील शीख आणि हिंदूंना वाचवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.