मरियम नवाझ यांच्या कारागृहातील बाथरूममध्ये लावले होते छुपे कॅमेरे, इम्रान सरकारवर मोठा आरोप

इस्लामाबाद : वृत्तसंस्था –   पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ यांनी इम्रान सरकारवर मोठा आरोप केला आहे. मुस्लिम लीग-नवाझच्या उपाध्यक्षा मरियम नवाझ यांच्यानुसार जेलच्या ज्या सेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते, तेथे गुप्त कॅमेरे लावण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर त्यांच्या वॉशरूममध्येसुद्धा कॅमेरे लावले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. मागच्या वर्षी चौधरी शुगर मिल्स प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांना जेलमध्ये डांबण्यात आले होते.

मरियम यांनी इम्रान सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, मी दोन वेळा जेलमध्ये गेले आहे. जर मी कोठडीत असताना अन्य महिला कैद्यांसोबत होणार्‍या प्रकारांचा सविस्तर खुलासा केला तर, यांना तोंड लपवण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यांनी सांगितले की, जर अधिकारी एका खोलीत घुसून त्यांचे वडील नवाझ शरीफ यांच्या समोर त्यांना अटक करू शकतात आणि त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करू शकतात, तर पाकिस्तानमध्ये कोणतीही महिला सुरक्षित नाही.

जियो न्यूजनुसार, मरियम यांनी म्हटले की, त्यांचा पक्ष संविधानाच्या कक्षेत लष्करासोबत चर्चा करण्यास तयार आहे, पण अट आहे की, सत्तेतील इम्रान सरकारला हटवले जावे. त्यांनी पुढे म्हटले की, त्या सरकारी संस्थांच्या विरोधात नाहीत आणि त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की चर्चा गुपचूप होणार नाही.

त्यांनी म्हटले की, पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट (पीडीएम) च्या मंचाच्या माध्यमातून चर्चा होऊ शकते. पीएमएल-एन नेत्याला मागील वर्षी मनी लॉन्ड्रिंगमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांनी दावा केला होता की, नॅशनल अकाउंटेबिलिटी (एनएबी) ने कायद्याचे उल्लंघन करून त्यांना अटक केली आहे आणि त्यांना राजकीयदृष्ट्या छळले जात आहे. मागच्या वर्षी एका पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे विशेष सहायक शहजाद अकबर यांनी म्हटले होते की, शरीफ कुटुंबाने मनी-लॉन्ड्रिंग आणि शेयर्सच्या अवैध हस्तांतरासाठी चौधरी साखर कारखान्यांचा वापर केला. कारखान्यांच्या शेयर्सच्या माध्यमातून 2008 मध्ये मरियम नवाझ यांनी 7 मिलियनपेक्षा जास्त शेयर ट्रान्सफर केले होते, जे 2010 मध्ये युसूफ अब्बास शरीफ यांना ट्रार्न्सफर करण्यात आले होते.