Coronavirus : PAK मध्ये मौलवीवर बंदी असताना देखील नमाजसाठी एकत्र केले 400 जण, FIR दाखल

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – मुख्य मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी तब्बल 400 लोकांना एकत्रित केल्याबद्दल पाकिस्तानमध्ये एका मौलवीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पाकिस्तानमध्ये भारताप्रमाणे सर्व धार्मिक स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 2800 पेक्षा अधिक झाली आहे. तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, लाल मशिदीचे माजी मौलाना अब्दुल अझीझ आणि इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सरकारी आदेशाचा भंग केल्याचा आणि मशिदीत लोकांना एकत्र आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौलवी अब्दुल अझीझ आणि इतर सहा जणांनी शुक्रवारच्या नमाजासाठी 400 लोकांना एकत्रीत जमा केले होते. रविवारी देण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना एकत्र जमण्यास आणि नमाज पठण करण्यास मनाई केले होती. तरी देखील सरकारी आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

अहवालात असेही म्हटले आहे की, अझीझवर भीती दाखवणे आणि लोकांना राज्याविरोधात भडकवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस आढळून येत आहे. आतापर्यंत 2800 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून एकट्या पंजाब प्रांतामध्ये संक्रमीत लोकांची संख्या 1 हजाराहून अधिक झाली आहे.

पाकिस्तानमध्ये आढळून आलेले करोनाबाधित 2800 रुग्णांपैकी 1131 जण पंजाब प्रांतातील आहेत. तर सिंधमध्ये 839, खैबर पख्तूनख्वा येथे 383, बलूचिस्तानमध्ये 175, गिलगित बल्टिसतान 193, इस्लामाबाद 75 आणि पीओकेमध्ये 12 प्रकरणे समोर आली आहेत. पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे 41 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी विश्व बँकेने कोरोनाशी लढण्यासाठी पाकिस्तानला 200 मिलीयन डॉलर (1500 कोटी रुपये) पेक्षा अधिक रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली आहे.