वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी बॉलरचे चिथावणीखोर कृत्य, बीएसएफचा संताप

वाघा बॉर्डरजवळ एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलेल्या चिथावणीखोर कृत्यामुळे सीमा सुरक्षा दलाचे जवान चांगलेच संतापले आहेत. भारताकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या कृत्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे वाघा बॉर्डरवर ध्वज उतरवण्याचा सोहळा (फ्लॅग डाउन परेड सेरेमनी) सुरू असताना पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज हसन अली याने बीएसएफच्या जवानांकडे आणि भारतीयांकडे पाहून चिथावणीखोर इशारे केले.

पाकिस्तान क्रिकेट टिमचे काही खेळाडू ध्वज उतरवण्याचा सोहळा पाहण्यास 21 एप्रिल रोजी आले होते. यावेळी भारत आणि पाकिस्तानचे जवान परेड करत असतानाच हसन अली पाकिस्तानी सैनिकांच्या मधोमध जाऊन उभा राहिला. पाकिस्तानचे जवान परेडमध्ये जे काही करत होते तसेच कृत्य हसन अली भारतीयांकडे पाहून करत होता.

आश्चर्य म्हणजे यावेळी पाकिस्तानच्या लष्करानेही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. मैदानावर गडी बाद केल्यानंतर ज्या प्रकारे अली आनंद साजरा करतो त्याचप्रमाणे तो भारतीयांकडे पाहून इशारे करत होता. बीएसएफने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूच्या या कृत्यावर नाराजी जाहीर केली आहे. प्रोटोकॉलनुसार सेरेमनीमध्ये केवळ जवानच सहभागी होऊ शकतात, सामान्य व्यक्तीला सहभागी होता येत नाही असे बीएसएफने म्हटले आहे. याबाबत पाकिस्तानी रेंजर्सला फोन करुन विरोध दर्शवण्यात आला आहे. असे इंडियन एक्सप्रेसनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हा चिथावणीखोर व्हिडीओ हसन अलीचा क्रिकेट बाबत बातम्या देणारी वेबसाइट क्रिकइन्फोने शेअर केला आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘डॉन’हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला असून मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.