भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांना लावले हुसकावून

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाबच्या खेमकरण सेक्टरमध्ये पाकिस्तानने ४ एफ १६ लढाऊ विमाने घुसविण्याचा प्रयत्न भारतीय हवाई दलाने मोडून काढला असून त्यांना हुसकावून लावले आहे. ही घटना १ एप्रिलला पहाटे ३ वाजता घडली.
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान गोंधळाला आहे. त्यातून नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान वारंवार तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करुन शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे.

पंजाब सीमेजवळ भारतीय रडारने चार पाकिस्तानी एफ १६ विमाने आणि एक मोठ्या आकाराचा यूएव्ही पाहिला. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि मिराज या विमानांनी उड्डाण घेतले. भारतीय लढाऊ विमाने आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच पाकिस्तानची लढाऊ विमाने माघारी फिरली.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी १४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर १३ दिवसांनी २७ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राईक करुन जैश-ए-मोहम्मदचा प्रशिक्षण तळ उद्धवस्त केला. तेव्हापासून भारताला कसे उत्तर द्यावे,  हा पाकिस्तानकडून प्रयत्न केला जात आहे.