9 महिन्यांच्या शोधानंतर पाकिस्तानला मिळाला ‘तेल’ आणि ‘गॅस’चा मोठा साठा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानला तेल आणि गॅसचा नवा साठा मिळाला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा मधील ताल ब्लॉकच्या ममीखेल विहिरीत हा साठा सापडला आहे. म्हंटले जात आहे की, हा नवीन साठा सापडल्यानंतर पाकिस्तानला उर्जेची गरज भागविण्यासाठी आयातीवर अवलंबून राहणे कमी होईल. त्यामुळे आयातीवरील पाकिस्तानचा खर्चही कमी होईल. पाकिस्तान ऑईलफिल्ड्स लिमिटेडने (पीओएल) मंगळवारी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजला जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, तेल आणि गॅस विहिरींच्या चाचणीने असे सिद्ध केले आहे की, दररोज 3240 बॅरल तेल आणि 16.12 मिलियन स्टॅंडर्ड क्युबिक गॅस तयार करण्याची क्षमता आहे.

मार्च 2020 मध्ये पाकिस्तानने दररोज 85000 बॅरल तेलाचे उत्पादन केले. दरम्यान , पाकिस्तानला आपल्या गरजांपैकी 80 टक्के तेल फक्त आयातातूनच मिळते. पाकिस्तान दररोज 4 अब्ज क्युबिट फिटपेक्षा कमी गॅस तयार करतो, तर त्याची आवश्यकता 7 अब्ज क्युबिट फिट आहे. गॅसची मागणी पूर्ण करण्यासाठीही पाकिस्तान आयातीवर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या सांख्यिकी ब्युरो (पीबीएस) च्या मते पाकिस्तान आपली उर्जेची गरज भागवण्यासाठी 9.8 अब्ज डॉलर्सची आयात करतो, जी त्याच्या एकूण आयातीच्या चतुर्थांश भागाची आहे. गेल्या जुलै ते मे या कालावधीत पाकिस्तानने एकूण 40.86 अब्ज डॉलर्स आयात केले आहेत.

माहितीनुसार, ममीखेल दक्षिण -01 च्या खोदण्याचे काम ऑक्टोबर 2019 मध्ये सुरू करण्यात आले आणि 23 मे 2020 रोजी 4939 मीटर खोलीपर्यंत खोदले गेले. त्यानंतर हायड्रोकार्बनचे साठे सापडले. सुमारे एक वर्षापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानमधील आशियातील सर्वात मोठा तेल साठा मिळण्याची आशा होती. इम्रान खान म्हणाले होते की, हा मोठा साठा पाकिस्तानमध्ये सापडला तर देशाचे भाग्य बदलेल. मात्र, केकरा -1 फिल्डमध्ये 6000 फुटांपेक्षा जास्त खोदकाम करूनही तेलाचा साठा सापडला नाही.

पाकिस्तानचे सागरी व्यवहार व परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला हुसेन हारुन यांनी दावा केला की, कुवेतच्या तेलाच्या साठ्यापेक्षा तेलाचा संभाव्य साठा खूपच मोठा असेल. पाकिस्तानच्या तेलाचा साठा 100 अब्ज बॅरेल्स ओलांडू शकेल, असा अंदाज पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी वर्तविला होता. सौदी अरबमध्ये प्रमाणित तेलाचा साठा 266 अब्ज बॅरल आहे.मार्च 2019 मध्ये पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, ते लवकरच देशाला एक चांगली बातमी सांगतील. तेलाच्या साठ्याबाबतच्या सर्व आशा खऱ्या ठरल्या पाहिजेत यासाठी प्रार्थना करावी, अशी विनंतीही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या देशवासियांना केली होती. दरम्यान, शेवटी, इम्रान खान यांच्या हाती निराशा आली. काही समीक्षक म्हणाले की सरकार जाणीवपूर्वक गुंतवणूकीचे वातावरण निर्माण करण्यासाठी असे दावे करीत आहे.