पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ‘कोरोना’ व्हायरसचा संशयित, डॉक्टरांनी केलं रूग्णाला ‘लॉक’, उपचारास दिला ‘नकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये वेगाने पसरलेल्या कोरोना विषाणूच्या धोक्याने पाकिस्तानमध्ये दहशत पसरली आहे. चीनमधील पाकिस्तानी दूतावासाने तेथील नागरिकांना स्वदेशी परत पाठविण्यासाठी दूतावास कार्यालयात त्यांची नोंदणी करण्यास सांगितले आहे. त्यात पाकिस्तानच्या सिंध प्रांतात कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण समोर आला आहे. चीनमधून परत आलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यामध्ये विषाणूची लक्षणे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याला वेगळे ठेवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधून परतलेला हा तरुण पेट्रोलियम अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून शाहजेब अली रहूजा असे त्याचे नाव आहे. त्याचा भाऊ इरशाद अली यांनी सांगितले की, शाहजेब वुहानमधील एका विद्यापीठात शिकत आहे आणि साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तो शनिवारी कतारमार्गे चीनमधून कराची येथे परतला. चीनमधील विमानतळावर शहजेबची तपासणी केल्यानंतर कराची विमानतळावर त्याची तपासणी केली गेली, परंतु कोणतीही अडचण आली नाही. मात्र घरी परत आल्यावर त्याला ताप आणि खोकला आला, त्यानंतर त्याला औषधे दिली गेली, पण नाकातून रक्तस्त्राव झाल्यावर आम्ही त्याला रुग्णालयात आणले. इरशादने या प्रकरणातील एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे ज्यामध्ये शहाजेब रुग्णालयाच्या पलंगावर बसला आहे आणि त्याच्या नाकातून रक्त बाहेर पडत आहे. शाहजेबवर अद्यापही खैरपूर जवळील पीर जो गोथ या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हिडिओमध्ये इरशादने सांगितले कि, शहजेबची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला खोलीत बंद केले आणि उपचार करण्यास नकार दिला.

इतकेच नाही तर व्हिडिओमध्ये इरशादने आरोप केला कि, डॉक्टरांनी आम्हाला शहजेबापासून वेगळे केले आहे. व्हायरल व्हिडिओत असे म्हटले आहे की, खैरपूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या आजारावर उपचारांची व्यवस्था नसल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णाला तपासणी व उपचारांसाठी कराची येथे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये 30 हजार पाकिस्तानी रहात आहेत, त्यापैकी 500 एकट्या वुहानमध्ये होते. सोमवारी 235 नागरिक चीनमधून इस्लामाबादला परतले, ज्यात 11 चीनी नागरिक आहेत.