PoK मधून हटवला पाकिस्तानचा ‘झेंडा’, आता सामाजिक कार्यकर्त्याला मिळतायेत धमक्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके) दादयाल शहरात पाकिस्तानचा ध्वज हटवण्याचे प्रकरण समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार तनवीर अहमद यांनी व्हिडिओद्वारे ध्वज हटवण्याचा दावा केला आहे. तनवीर अहमद यांच्या म्हणण्यानुसार, तेथून पाकिस्तानी ध्वज काढून टाकल्यानंतर सुरक्षा दलाने त्यांची दिशाभूल केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे.

व्हिडिओमध्ये तनवीर असे म्हणत आहेत की तेथून पाकिस्तानी ध्वज काढल्यानंतर गुप्तचर संस्था त्यांच्या मागे आहेत. तेवढ्यात ते एका भिंतीवर चढतात आणि चौकात फडकलेला दुसरा एक पाकिस्तानी ध्वज काढून टाकतात. प्रशासनाने या भागात उपस्थित असलेले सर्व पाकिस्तानी झेंडे हटवावेत अशी मागणी करत तनवीर काही दिवस उपोषणावर होते.

स्थानिक प्रशासनाने जेव्हा त्यांची मागणी मान्य केली नाही, तेव्हा ते स्वत: ध्वज काढण्याच्या कामात सामील झाले. पीओकेचे लोक या भागात असलेल्या पाकिस्तानवरील अवैध ताब्याला विरोध करीत आहेत आणि ते पाकिस्तानी सैन्य आणि इतर अधिकाऱ्यांना हा परिसर सोडून जाण्याची मागणी करत आहेत.