पाकिस्तानमधून 2015 मध्ये भारतात आली होती गीता, आता महाराष्ट्रात मिळाली तिला आपली आई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये एका सामाजिक कल्याण संस्थेने ज्या मूकबधीर भारतीय मुलगी आश्रय दिला होता आणि 2015 मध्ये भारतात पाठवले होते, तिला अखेर महाराष्ट्रात तिची खरी आई सापडली आहे. ती चुकीने पाकिस्तानमध्ये गेली होती. 2015 मध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी मुलीला भारतात आणण्याची व्यवस्था केली होती.

पाकिस्तानच्या ‘डॉन’ वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की, जागतिक स्तरावर प्रसिद्ध ईधी वेल्यफेयर ट्रस्टचे माजी प्रमुख दिवंगत अब्दुल सत्तार ईधी यांच्या पत्नी बिलकिस ईधी यांनी सांगितले की, गीता नावाच्या भारतीय मूकबधीर मुलीला महाराष्ट्रात तिच्या खर्‍या आईची भेट घडवून आणली आहे.

बिलकिस यांनी सांगितले की, ती माझ्या संपर्कात होती आणि या आठवड्याच्या अखेरीस तिने मला आपली खरी आई सापडल्याची खुशखबर दिली. त्यांनी दुजोरा दिला की, तिचे खरे नाव राधा वाघमारे आहे आणि तिची खरी आई महाराष्ट्र राज्यातील नैगाव मध्ये सापडली. बिलकिस यांच्यानुसार, त्यांना गीता एका रेल्वे स्टेशनवर सापडली होती आणि तेव्हा ती 11-12 वर्षांची असेल. त्यांनी तिला कराचीच्या आपल्या केंद्रात ठेवले होते.

त्यांनी म्हटले की, ती कोणत्या तरी प्रकारे पाकिस्तानात आली होती आणि जेव्हा कराचीमध्ये आम्हाला सापडली तेव्हा ती निराधार होती. बिलकिस यांनी सांगितले की, त्यांनी तिचे नाव फातिमा ठेवले होते, परंतु जेव्हा त्यांना समजले की, ती हिंदू आहे, तेव्हा तिचे नाव गीता ठेवले गेले. मात्र, ती ऐकू आणि बोलू शकत नाही.

बिलकिस यांनी सांगितले की, गीताला आपले खरे आई-वडील शोधण्यासाठी सुमारे साडेचार वर्ष लागली आणि याची पडताळणी डीएनए चाचणीद्वारे करण्यात आली आहे. गीताच्या खर्‍या वडीलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे आणि तिच्या आईने दुसरा विवाह केला आहे.