बालाकोट हल्ल्याच्या पुराव्यावर मोदींनी दिलं ‘हे’ स्पष्टिकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे हल्ला केल्यानंतर विरोधकांनी यावर पुरावे मागितले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना आता चांगलेच उत्तर दिले आहे. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये झालेल्या हल्ल्याचा पुरावा हा खुद्द पाकिस्ताननेच दिला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. एक वृत्ततवाहिनीला मोदींनी मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले.

बालाकोट हल्ला झाला की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असले तरी त्याचा पुरावा खुद्द पाकिस्ताननेच दिला आहे. पाकिस्ताने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले हाच त्यावर पुरावा होता. मात्र, या हल्ल्यात किती जण मारले गेले यावर चर्चा होत राहतील त्या होऊ द्या, असं मोदींनी सांगितलं.

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने त्याचा जागतिक स्तरावर गोंधळ घातला असता. त्यामुळे आम्हाला इथे निर्लष्करी कारवाई करायची होती. हवाई हल्यावेळी एकीकडे पाकिस्तानी जनतेच्या भल्याचा आम्ही विचार केला तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट करायचे आमचे ठरले होते, असंही मोदींनी स्पष्ट केले.

दरम्यान, आमच्या भूमीवर दहशतवादी नाहीत असं पाकिस्तान नेहमीच जगाला सांगत आला आहे. परंतू, भारताच्या या कारवाईमुळे ते उघडे पडले. भारतातून पाकिस्तानला हायसं वाटेल असे प्रश्न का विचारले जातात हा खरा प्रश्न आहे, असंही मोदींनी यावेळी सांगितलं.