काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानच्या राष्ट्रपतींची भारताला ‘धमकी’, युद्ध झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा केल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात महागाई पसरली असून त्यांनी आपल्या देशातील नागरिकांना संकटाच्या खाईत लोटले आहे.त्याचबरोबर अनेक धमक्या देखील पाकिस्तान भारताला देत असून आज पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनादिवशी देखील भारताला धमक्या देण्याचे सत्र सुरूच आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी यावेळी भारताला धमकावताना म्हटले आहे कि, पाकिस्तानला शांतता हवी आहे, मात्र जर भारताला युद्ध हवे असेल तर त्यांच्याजवळ जिहाद आणि आमचा मुकाबला करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही. आज पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनाच्या दिवशी संबोधित करताना त्यांनी म्हटले कि, पाकिस्तान नेहमीच काश्मीरमधील नागरिकांसोबत उभा आहे. त्याचबरोबर आम्ही काश्मिरींची मदत करण्यापासून मागे हटणार नाही तसेच आम्ही हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात घेऊन जाणार असून भारताने हा निर्णय घेताना संयुक्त राष्ट्राच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप देखील त्यांनी केला.त्याचबरोबर भारताने शिमला करार मोडल्याचा आरोप देखील त्यांनी भारतावर केला.

दरम्यान, भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे भडकलेल्या पाकिस्तानने आतापर्यंत अनेक राष्ट्रांकडे मदत मागितली असून सर्वांनी हा भारताचा अंतर्गत विषय असल्याने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पाकिस्तान एकाकी पडल्याचे सध्या दिसून येत असून भारताकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त