कलम 370 ! PAK ची ‘केविलवाणी’ धडपड सुरूच, आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडणार ‘काश्मीर’चा मुद्दा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानची प्रत्येक हालचाल फोल ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे प्रकरण उपस्थित करण्यासाठी तो सातत्याने प्रयत्नशील आहे. जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडून रिकाम्या हाताने परतल्यानंतर आता पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानी माध्यमांच्या दाव्यानुसार आता पाकिस्तान जम्मू-काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात उपस्थित करेल. यापूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता, पण तेथे पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या जवळपास सर्वच देशांनी (चीन वगळता) या मुद्द्यावर तटस्थता दर्शवली.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी UNSC मध्ये पाकिस्तानवर निशाणा साधला. ते म्हणाले की जिहादच्या नावाखाली पाकिस्तान भारतात हिंसाचार पसरवत आहे. आम्ही नेहमीप्रमाणेच आमचे धोरण कायम ठेवले आहे. कलम ३७० हटविणे ही भारताची अंतर्गत बाब आहे. काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयात बाहेरील लोकांना हस्तक्षेप करण्याचे कारण नाही.

पाकने युएन सुरक्षा परिषदेची मदत मागितली :
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी एक निवेदन जारी करुन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला मदतीची विनंती केली. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दले तैनात केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, संयुक्त राष्ट्र संघटनेचे ठरावांचा हवाला देत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात, जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप भारतावर करण्यात आला. तसेच काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) विनंती करण्यात आली आहे.

शाह महमूद कुरेशी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की पाकिस्तान या विषयावरील चर्चेला विरोधी नाही, परंतु या चर्चेत भारत आणि पाकिस्तानशिवाय तृतीय पक्ष असले पाहिजेत. सुरक्षा परिषदेला आवाहन करत पाकिस्तानने मोदी सरकार आणि सध्याच्या वातावरणात भारताशी वाटाघाटी करू शकत नाही, असे सांगत काश्मीरप्रती भारत सरकार निर्दयी असल्याचा आरोप केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त