पाकिस्तानच्या न्यायालयाची भारताविरूध्द ‘शेरेबाजी’

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अतहर मिनल्लाह यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भारताला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पाकिस्तानातील अनेक राजकीय नेते देखील भारताविरोधी वक्तव्ये देत असताना समोर आले आहे.

पाकिस्तानात पीएटीएम पक्षप्रमुख मंजूर पश्तीन यांच्या अटकेविरोधात आंदोलने छेडण्यात आली होती, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाशी आणि दहशतवादी कारवाईशी संबंधित कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर पाकिस्तानच्या हायकोर्टात या २३ कार्यकर्त्यांच्या जामिनावर सुनावणी करण्याच्या दरम्यान भारतविरोधी वक्तव्य करण्यात आले आहे.

इस्लामाबाद हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली असून त्यावेळी कोर्टाने पोलिसांची कानउघडणी केली. या दरम्यान मुख्य न्यायाधीश म्हणाले की, ‘लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी होणे अपेक्षित नाही आणि सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करावी अशी अपेक्षा कोर्टाला नाही. इथे सर्वांच्या संविधानिक अधिकाराचे रक्षण केले जाते. कारण हा देश भारत नसून पाकिस्तान आहे.’

दरम्यान पाकिस्तान कोर्टाने भारताविरोधी केलेल्या या वक्तव्यावर अजून तरी भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये विद्यार्थ्यांनी शुल्कवाढीच्या विरोधात आंदोलन पुकारले होते, त्या आंदोलनात देखील काही विद्यार्थी नेत्यांना अटक करण्यात आली होती. तर, काहींना अज्ञात जागी नेण्यात आले होते. दरम्यान पाकिस्तानकडून भारताला कमी लेखण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतच असतात.