इमरान खान यांच्या विशेष सहाय्यक डॉक्टरांनी केला ‘खुलासा’ ! पाकिस्तानात ‘कोरोना’ विषाणू संक्रमणाचा पॅटर्न ‘उलट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत १०२२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे पाकिस्तानात अधिकतर तरुणांना कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. तर इतर देशांमध्ये ६० वर्षांहून अधिक वयाचे लोक या विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची चिंता वाढली आहे, कारण त्यांनी आधीच आपली मजबुरी जाहीर केली होती की या महामारीला लढायला पुरेसे साधन त्यांच्याकडे उपलब्ध नाही.

पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार पंतप्रधान इमरान खान यांचे आरोग्य विषयक सहाय्यक डॉ. जफर मिर्झा यांनी बुधवारी हा धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, ‘पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची लागण होणारी २४ टक्के प्रकरणे ही २१ वर्ष ते ३० वर्षांच्या तरुणांशी संबंधित आहेत. संक्रमणाच्या बाबतीत ही संख्या खूप जास्त आहे. इतर देशांमध्ये, या विषाणूने जास्तकरून वयोवृद्धांना आपल्या कचाट्यात पकडले आहे, परंतु पाकिस्तानमध्ये उलट आहे.’

तसेच डॉ. मिर्झा म्हणाले की, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण ५२२५ लोकांना क्‍वारंटाइन केंद्रात ठेवले गेले आहे. यापैकी २३ टक्के लोकांची चाचणी सकारात्मक आली आहे, तर उर्वरित लोकांना सुरक्षेच्या सूचना देऊन घरी पाठविण्यात आले आहे. तथापि, पाकिस्तानच्या क्‍वारंटाइन शिबिरांच्या बिकट अवस्थेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोक येथे अतिशय कठीण परिस्थितीत जगत आहेत.

या कठीण काळात पाकिस्तानला चीनची मदत मिळाली आहे. बुधवारी पाकिस्तानला चीनकडून पाच लाख एन-95 मास्क मिळाले आहेत. हे मास्क कोरोना विषाणूच्या रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि त्या संबंधित कार्यरत असणारे लोक वापरतील. आगामी काळात चीन पाकिस्तानला आणखी मदत करेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानमधील कोरोना विषाणूची लागण झालेले बहुतेक लोक इराणहून परत आले आहेत. पाकिस्तानमधील लोक मोठ्या संख्येने इराणला धार्मिक भेटीवर गेले होते. म्हणूनच पाकिस्तान सरकारने कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी इराण सीमेवर अनेक कॅम्प सुरू केले आहेत, इराणमधून घरी परत आलेल्या लोकांना तिथे ठेवले जाते.