Saudi Arabia-Pakistan Relation : सौदी अरब-पाकिस्तानची मैत्री तुटली, परत करावे लागतील दोन अरब डॉलर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान आणि सौदी अरबच्या मैत्रीत काश्मीरवरून निर्माण झालेली दरी दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी काश्मिरबाबत सौदी अरेबियाला आव्हान दिले होते. कुरेशी यांच्या या वक्तव्याने नाराज सौदीला समजावण्यासाठी पाकिस्तानने आपले लष्करप्रमुख कमर बाजवा यांनाही पाठवले होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, पुढील महिन्यात पाकिस्तानला पुढील महिन्यात सौदी अरबला 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करावे लागू शकते.

पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे की, सरकार सौदी अरबचे कर्ज परत करण्याची तयारी करत आहे आणि यासोबतच अन्य स्रोतांकडून कर्ज जमवण्याच्या प्रयत्नात आहे. जेणेकरुन परकीय चलन साठा 12 अरब डॉलर्सवर राहील. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीपासूनच अस्थिर आहे आणि महागाई शिगेला पोहचली आहे, अशा परिस्थितीत सौदीचे कर्ज परत करणे त्यांच्यासाठी खूप त्रासदायक ठरेल.

सूत्रांचे म्हणणे आहे की, सौदी अरेबियाच्या कर्जाचा दुसर्‍या हप्त्याचा कालावधी पुढच्या महिन्यात पूर्ण होत आहे आणि शक्यता आहे की सरकार दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड करेल. हा हप्ता 1 अरब डॉलर्सचा होता. पाकिस्तानची अर्थव्यवस्था जेव्हा गर्तेत आडकली होती आणि पेमेंटच्या संकटाला देश सामोरे जात होता तेव्हा सौदी अरबने पाकिस्तानला सुमारे 6.2 अरब डॉलर्सचे आर्थिक पॅकेज दिले होते. यामुळे पाकिस्तान डिफॉल्टर होण्यापासून वाचला.

पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, दोन्ही देशांमधील हा अत्यंत गोपनीय मुद्दा आहे. मात्र, एका उच्च सरकारी अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पुढील महिन्यात पाकिस्तान कर्जाची परतफेड करण्याची दाट शक्यता आहे.

एक्स्प्रेस ट्रिब्यूनने पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाला सौदी अरबच्या कर्जासंदर्भात प्रश्नही पाठविले आहेत. वृत्तपत्राने अर्थ मंत्रालयाला प्रश्न विचारले आहे की, पाकिस्तान सौदीच्या 1 अरब डॉलर कर्जाव्यतिरिक्त युएईचे 2 अरब डॉलरचे कर्ज परत करणार आहे का. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, अशी आशा तर होती की राजकीय पातळीवरील प्रयत्नानंतर आखाती देश कर्ज परत करण्यासाठी पाकिस्तानला एक वर्षाचा आणखी वेळ देईल. मात्र, शक्यता जास्त नव्हती.

सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोन वेळा सौदी अरबच्या दौर्‍यावर गेले, जेणेकरून आर्थिक मदत मिळवणे सोपे होईल. यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) पॅकेज मिळविणेही सुलभ झाले. सौदी अरबने तीन वर्षांच्या कालावधीत पाकिस्तानला सुमारे 6.2 अरब डॉलर्स कर्ज देण्याचे मान्य केले होते. यात 3 अरब डॉलर्सची रोकड मदत आणि 3.2 अरब डॉलर्सच्या किंमतीचे तेल आणि गॅस पुरवठ्याचे पैसे नंतर देण्याची सूट सहभागी होती. करारानुसार सौदीच्या कर्जावर तेल पुरवठ्याची सुविधा केवळ एका वर्षासाठी होती. यात आणखी एक पर्याय जोडला होता की, पुढील तीन वर्षांसाठी ही सुविधा वाढविली जाऊ शकते.

3 अरब डॉलर्सच्या तेलपुरवठ्यावर पाकिस्तानला 3.2 टक्के व्याज द्यावे लागले होते. सौदीने तेलपुरवठा सुविधा यापूर्वीच संपविली आहे आणि यावर्षी मेमध्ये पाकिस्तानने सौदीला 1 अरब डॉलरचे कर्जदेखील परत केले होते. सूत्रांनी सांगितले की, सरकार सौदीचे कर्ज परतफेडण्यासाठी सर्व पर्यायांवर विचार करत आहे.

पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने एक्सप्रेस ट्रिब्यूनला सांगितले की, चीनकडून पाकिस्तानला 2 अरब डॉलर्सचे कर्ज मिळू शकते. गेल्या वेळीही पाकिस्तानने चीनच्या मदतीने सौदी अरेबियाचे कर्ज परत केले होते. मात्र, अधिकार्‍याने हे सांगितले नाही की चीन कोणत्या सवलतींवर कर्ज देईल किंवा हे व्यावसायिक कर्ज असेल. चिनी अधिकर्‍यांनी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) च्या संथ प्रगतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सूत्रांनी सांगितले की, असे असूनही चीन पाकिस्तानसोबत सामरिक भागीदारीचे महत्त्व पाहून आर्थिक मदतीसाठी पुन्हा एकदा पुढे येईल.

जागतिक संस्था आयएमएफने सुद्धा पाकिस्तानच्या मदतीसाठी 6 अरब डॉलरच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती, पण त्याच्या कठोर अटी पूर्ण न करू शकल्याने पॅकेज अटकले. पाकिस्तानला आपल्या परकीय चलन साठ्याची स्थिती योग्य राखण्यात अडचणी येत आहेत. सूत्रांनी सांगितले की, जर आयएमएफची मदत भविष्यात मिळाली नाही तर जागतिक बँकसुद्धा आपला हात मागे घेऊ शकते.

पाकिस्तानचा सध्याचा परकीय चलन साठा 12 अरब डॉलरचा आहे, ज्यामध्ये बहुतांश परकीय कर्जाचे योगदान आहे. पाकिस्तानने सर्वात जास्त कर्ज चीन, सौदी अरब आणि यूएईकडून घेतले आहे.

पाकिस्तानने परकीय चलन साठ्याची स्थिती योग्य राखण्यासाठी चीनकडून सुद्धा 3 अरब डॉलरचे कर्ज घेतले होते. चीनकडून घेतलेल्या या कर्जाची मुदतही पुढच्या वर्षी मे महिन्यात पूर्ण होत आहे. या गोष्टीची पूर्ण शक्यता आहे की, पाकिस्तान चीनचे कर्ज फेडण्यासाठी आणखी वेळेची मागणी करेल.