अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन, पाकिस्तानची पोटदुखी सुरु

इस्लामाबाद : वृत्तसंस्था –   सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम सोहळा पार पडला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन सोहळा पार पडत असताना पाकिस्तानची पोटदुखी समोर आली आहे. पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री शेख रशीद अहमद यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्यावर भारतावर टीका केली आहे. भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नसून ‘राम नगर’ झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

मंगळवारी एका व्हिडिओद्वारे शेख रशीद अहमद यांनी भारता विरोधात गरळ ओकली आहे. त्यांनी म्हटले की, जगाच्या नकाशावरुन आता एक सर्वात जुने धर्मनिरपेक्ष राष्ट्र हटले आहे. भारत आता हिंदुत्ववादी देश झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे. काश्मीरच्या मुद्यावर शेख यांनी भारतावर टीका केली. काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर भारतात मुस्लिमांवर अत्याचार सुरु असून त्यामध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तान आणि जगभरातील मुस्लिम काश्मिरी जनतेसोबत असल्याची टिमकी देखील त्यांनी वाजवली.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू, शीख आणि अन्य समुदायांवर हल्ले होत आहेत. अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळावर पाकिस्तानमधील धार्मिक कट्टरवाद्यांकडून हल्ले सुरु आहेत. काही महिन्यापूर्वी इम्रान खान यांच्या सरकारने श्रीकृष्ण मंदिरासाठी निधी दिल्यानंतर मुस्लिम धार्मिक कट्टरवाद्यांनी सरकारवर टीका केली होती. तसेच गुरुद्वाराही काही कट्टवाद्यांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले होते.