PAK : इम्रान खान सरकारकडून माजी पंतप्रधान नवाज शरीफ फरार घोषित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना फरार घोषित केले आहे. सरकारने शरीफ यांच्यावर वैद्यकीय अहवाल न पाठविल्याचा आणि जामीन तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांचा जामीन देखील रद्द करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या शरीफ यांना मागील वर्षी २९ ऑक्टोबरला हायकोर्टाने आरोग्याच्या कारणावरून आठ आठवड्यांचा जामीन मंजूर केला होता. १९ नोव्हेंबर रोजी ते लंडनमध्ये उपचारासाठी गेले होते, परंतु त्यानंतर ते परत आलेच नाहीत.

पंतप्रधान इमरान खानचे सल्लागार डॉ. फिरदौस आशिक अवान यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, शरीफ आपला वैद्यकीय अहवाल पाठविण्यात अपयशी ठरले. त्यांनी एक वैद्यकीय प्रमाणपत्र पाठवले होते, जे पुरेसे नाही. या आधारावर त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. जर ते लंडनहून लवकर नाही परतले तर त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित केले जाईल.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले होते. शरीफ यांना अनेकवेळा पत्र लिहून लंडनच्या रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल दाखल करण्यासाठी सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी केवळ एक प्रमाणपत्र पाठविले, जे वैद्यकीय मंडळाने स्वीकारले नव्हते. जर नवाज यांची प्रकृती खरोखर गंभीर असेल तर त्यांना सविस्तर वैद्यकीय अहवाल दाखल करण्यास हरकत नसावी.

शाहबाज यांना देखील घेरले
इम्रान यांच्या सल्लागाराने नवाजचे भाऊ आणि विरोधी पक्षाचे नेते शाहबाज शरीफ यांच्यावरही जोरदार हल्ला केला आहे. ते म्हणाले, शाहबाज काही कारणास्तव काही महिन्यांपासून लंडनमध्ये गेले आहेत. ते आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यांच्यासाठी येथे भव्य ऑफिस आहे, ज्यावर दरमहा मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्यांनी त्वरित लंडनहून परत यावे. शरीफ यांच्या वैयक्तिक डॉक्टरांनी दावा केला आहे की, माजी पंतप्रधान गंभीर हृदयविकाराने ग्रस्त आहेत. धमनी संबंधित या रोगाचे निदान शस्त्रक्रियेद्वारे केले जाऊ शकते, जे की बरेच गुंतागुंतीचे आहे.