अरेच्या खरंच ! मोबाईल ‘इंटरनेट स्पीड’च्या बाबतीत पाकिस्ताननं भारताला टाकलं मागे, PAK मध्ये मिळतं ‘एवढं’ mbps

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – भारताने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानाने ईर्ष्येपोटी घेतलेल्या निर्णयांमुळे पाकिस्तानची अवस्था जागतिक पातळीवर बिकट झाली आहे. मात्र तरीही एका बाबतीत मात्र पाकिस्तान भारताच्या पुढे असल्याचे एका संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात उघड झाले आहे.

मोबाइल इंटरनेट डाउनलोड गतीच्या बाबतीत पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे. इंटरनेट गतीचे नकाशे तयार करणाऱ्या ‘ऊकला’ या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालाच्या आधारे पाकिस्तानी माध्यमांनी हा दावा केला आहे. ऊकालाने जगातील मोबाइल आणि ब्रॉडबँड इंटरनेट गतीचा अहवाल जारी केला आहे. हा सर्व्हे संस्थेने १४४ देशांमध्ये केला आहे. या १४४ देशांच्या मोबाइल इंटरनेट डाउनलोड स्पीडच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक १३० आहे, तर पाकिस्तान ११६ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान मोबाइल इंटरनेट डाउनलोड गती १३.५५ एमबीपीएस आहे.

या यादीनुसार, जगातील सर्वोत्तम मोबाइल इंटरनेट डाउनलोड गतीमध्ये दक्षिण कोरिया हा देश अव्वल स्थानावर आहे. या देशातील इंटरनेट स्पीड ९७.४४ एमबीपीएस असून हा जगातील सर्वाधिक स्पीड आहे. त्याच बरोबर, अहवालात असेही म्हटले आहे की ब्रॉडबँड इंटरनेट गतीच्या बाबतीत सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. येथील स्पीड १९१.९३ इतका आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलिया (६३.३४ एमबीपीएस) आणि कतार ( ६१.२७ एमबीपीएस) अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आहेत.