पाकिस्ताननं ‘एअर स्पेस’ बंद केल्यामुळं विमान कंपन्यांना ५५० कोटींचा ‘भुर्दंड’, हज यात्रेमुळं उठविली बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाईदलाने बालाकोट येथील हदशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने बंद केलेले त्यांच्या हद्दीतून जाणारे हवाई मार्ग सर्व प्रकारच्या नागरी वाहतुकीसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा खुले केल्याने विमान कंपन्या व प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला. गेल्या २७ फेब्रुवारीपासून पाकिस्तानने हे मार्ग बंद केल्याने भारतातून आणि खासकरून उत्तर भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या शेकडो प्रवासी विमानांना गेले साडेचार महिने अधिक वेळ लागणाऱ्या व खर्चिक आडवळणाच्या पर्यायी मार्गांनी जावे लागत होते. यामुळे भारतीय विमान कंपन्यांना गेल्या साडेचार महिन्यात तब्बल ५५० कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे.

हज यात्रेसाठी भारतातून लाखो मुस्लिम भाविक मक्का मदिना येथे विमानाने जातात. ही यात्रा आता सुरु होत आहे. त्यामुळे मुस्लिम भाविकांना त्याचा त्रास झाला तर आपल्या देशातही त्याची प्रतिक्रिया उमटेल, असे वाटल्याने पाकिस्तानने ही हवाई बंदी उठविल्याचे बोलले जात आहे. जुलैपर्यंत इंधनाच्या वाढीव खर्चापोटी सुमारे ५५० कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागल्याची माहिती विमान वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत दिली होती.

यापैकी सर्वाधिक ४९१ कोटी रुपयांचे नुकसान डबघाईला आलेल्या एअर इंडियाला सोसावे लागले. स्पाईसजेटला ३०.७ कोटी रु. इंडिगोला २५.१ कोटी रु. तर गोएअरला २.१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. भारताने पाकिस्तानी विमानांना हवाई मार्ग बंद केल्याने तेथील विमान कंपन्यांनाही मोठे नुकसान सोसावे लागले आहे.

सीमेजवळच्या हवाई तळांवर जय्यत तयारीत ठेवलेले लढाऊ विमानांचे ताफे भारत जोपर्यंत हटविणार नाही तोपर्यंत हवाई मार्ग बंदच राहतील, असे पाकिस्तानने गेल्याच आठवड्यात सांगितले होते. मात्र सोमवारी मध्यरात्री १२.४१ वाजल्यापासून हे सर्व हवाई मार्ग सर्व प्रकारच्या नागरी वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने अचानकपणे जाहीर केले.

पाकिस्ताने निर्बंध उठविल्याने भारतानेही आपल्या बाजूने घातलेले निर्बंध लगेच हटविले. परिणामी उभय देशांदरम्यानची नागरी विमानवाहतूक नेहमीप्रमाणे पूर्ववत झाली आहे, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ट्विटरवरून जाहीर केले.

पाकिस्तानने ही घोषणा केली तेव्हा एअर इंडियाचे सॅन फ्रान्सिस्कोहून दिल्लीला येणारे व टर्किश एअरलाइनचे इस्तंबूलहून दिल्लीला येणारे विमान अर्ध्या वाटेवर होते. त्यामुळे त्यांनी या संधीचा लगेच फायदा घेतला व आडवळण न घेता ती पाकिस्तानवरून सरळ दिल्लीला आधीच पोहोचली. भारतातील इतरही विमान कंपन्यांनी या बंदीमुळे बाधित झालेल्या मार्गांवरची उड्डाणे नेहमीच्या मार्गाने मंगळवार सायंकाळपासून किंवा बुधवारपासून सुरु करण्याची तयारी केली. यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचेलच, पण तिकिटांचे चढलेले दरही कमी होतील.

बालाकोट हल्ल्यानंतर सुरुवातीस पाकिस्तानने आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली होती. पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून पश्चिमेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या विमानांचे एकूण ११ मार्ग आहेत. हे मार्ग बंद झाल्याने खास करून उत्तर भारतातील शहरांतून पश्चिमेकडे अरबस्तान, युरोप व अमेरिकेकडे जा-ये करणाऱ्या विमानांना गुजरात किंवा महाराष्ट्रावरून वळण घेऊन जावे लागत होते. यामुळे या प्रत्येक प्रवासाचा वेळ एक ते दीड तासाने वाढला होता.

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like