पाकिस्तानमध्ये 2 लाखापर्यंत पोहोचली ‘कोरोना’ संक्रमितांची संख्या, एका दिवसात आढळली 4044 प्रकरणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पाकिस्तानमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या जवळपास २ लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांत देशात कोरोनाची ४,०४४ प्रकरणे आढळली आहेत आणि यासह संक्रमितांची संख्या १ लाख ९२ हजारांवर गेली आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयानेही माहिती दिली आहे की, देशात कोरोनामुळे १४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांचा आकडा ३,९०३ वर पोहोचला आहे.

पाकिस्तानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सिंध आणि पंजाबमधून जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली जात आहेत. एका दिवसात ४ हजाराहून अधिक नवीन रुग्णांसह देशात संक्रमितांची एकूण संख्या १ लाख ९२ हजार ९७० पर्यंत पोहोचली आहे.

सर्वात जास्त ७४,०७० प्रकरणे सिंधमध्ये आणि ७१,१९१ प्रकरणे पंजाबमध्ये नोंदवली गेली आहेत. याशिवाय २३,८८७ प्रकरणे खैबर पख्तुनवा, ११,७१० इस्लामाबाद, ९,८१७ बलुचिस्तान, १,३६५ गिलगिट-बाल्टिस्तान आणि ९३० प्रकरणे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये नोंदवली गेली आहेत. पाकिस्तानमध्ये एकूण संक्रमितांपैकी ८१,३०७ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य प्रशासनाने आतापर्यंत १,१७१,९७६ लोकांची चाचणी केली असून त्यापैकी बुधवारी २१,८३५ चाचण्या केल्या गेल्या आहेत.