आर्थिक अडचणीमुळं पाकिस्तानचे इम्रान पत्नी बुशरासह पोहचले उमरहा करण्यासाठी मक्क्यात (फोटो)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानने सध्या विविध देशांकडे मदत मागण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक देशांनी नाकारल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात महागाईचा आगडोंब कोसळला आहे. त्यामध्येच पंतप्रधान इम्रान खान हे आपली पत्नी बुशरासह गुरुवारी सौदी अरबमधील मक्का येथे गेले होते. पाकिस्तानच्या पहिल्या महिला आणि इम्रान खान यांची तिसरी पत्नी असलेल्या बुशरा यादेखील यावेळी त्यांच्यासोबत होत्या.

त्यानंतर इम्रान खान यांच्या शिष्टमंडळाने देखील शुक्रवारी मक्काचा दौरा केला. त्याआधी गुरुवारी इम्रान खान यांनी सौदीचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली होती. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी, आर्थिक सल्लागार हफीज शेख त्याचबरोबर अनेक अधिकारी यावेळी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबर होते. गुरुवारी इम्रान खान यांनी सौदीचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेमध्ये त्यांनी काश्मीर मुद्दा देखील उपस्थित केला होता. त्यामुळे मुस्लिम राष्ट्र काश्मीरच्या मुद्द्यावर काय विचार करतात याचा सध्या पाकिस्तान आढावा घेत आहे.

दरम्यान, कलम 370 रद्द केल्यानंतर भडकलेला पाकिस्तान सध्या भारताविरुद्ध षडयंत्र रचत असून भारताविरुद्ध युद्धाची देखील त्यांची तयारी असल्याची माहिती मिळत आहे.