LoC वर येऊन इम्रान खान ‘बरगळला’ ! म्हणाला – ‘काश्मीर पाकिस्तानचा वीक पॉइंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर महिना उलटून गेला आहे. मात्र पाकिस्तानने अजूनही हा निर्णय स्वीकारल्याचे दिसत नाही. यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरच्या मुद्द्याला नेण्याचा प्रयत्न करत असून अनेक वेळा त्यांनी या मुद्द्यावरून भारताला धमकी देखील दिली आहे.

काल त्यांनी नियंत्रण रेषेवर जात काश्मीर हा कळीचा मुद्दा असल्याचे म्हणत भारताने घेतलेला निर्णय भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांनी संरक्षण दिवसाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि विविध देशांच्या राजधान्यांमध्ये काश्मीरचा मुद्दा मांडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी या मुद्द्यावर अधिक बोलताना म्हटले कि, काश्मीर विषय हा पाकिस्तानचा वीक पॉईंट असून त्यामध्ये बदल करून भारत रोष ओढवून घेत आहे.

मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अणु कार्यक्रमाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर हा खूप गंभीर विषय असून संपूर्ण जगावर याचे परिणाम होणार आहेत.  त्यामुळे यासाठी संपूर्णपणे भारत जबाबदार राहणार आहे.

दरम्यान, पाकिस्तानला युद्ध नको आहे, मात्र पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका आणि टक्कर देणाऱ्या राष्ट्रविरोधात आम्ही शांत बसणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.