पाकिस्तानमध्ये घडली सामूहिक बलात्काराची घटना, इमरान खान यांनी बॉलिवूडचा केला ‘धिक्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारताची राजधानी दिल्ली ही जगातील बलात्कारांची राजधानी बनली आहे असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी म्हटले आहे. यासाठी इम्रान खानने बॉलिवूड चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या अश्लीलतेला दोष दिला. पाकिस्तानला बॉलीवूडच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी तो आपल्या देशात इस्लामिक मालिका दाखवत असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या कराची शहरात झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे लोक हादरले असून लोक रस्त्यावर निषेध करीत आहेत. सोमवारी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी महिलांवरील वाढते अत्याचार आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील मुद्द्यांविषयी सांगितले.

इम्रान खान म्हणाले, जगाचा इतिहास दर्शवितो की जेव्हा समाजात पोर्नोग्राफी वाढते तेव्हा दोन गोष्टी घडतात – एक म्हणजे लैंगिक गुन्हेगारी वाढते आणि कौटुंबिक व्यवस्था तुटू लागते. इम्रान खान म्हणाले की, असे गुन्हे थांबविण्याची जबाबदारी केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्थाच नाही तर समाजाची देखील आहे.

पाश्चात्य देशांशी पाकिस्तानच्या कौटुंबिक व्यवस्थेची तुलना करतांना इम्रान खान म्हणाले, “आपली कौटुंबिक व्यवस्था मजबूत आहे आणि आपण आपली न्यायालयीन व्यवस्था सुधारू शकतो परंतु जर आपली कुटुंब व्यवस्था स्वतःच कोसळली तर ती पुन्हा उभी राहू शकणार नाही.”

इम्रान खान यांनी भारताचा उल्लेख केला आणि सांगितले की, बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अश्लीलतेमुळे नवी दिल्लीमध्ये लैंगिक गुन्हे वाढले आहेत. ते म्हणाले, बॉलिवूडचा वाईट परिणाम भारतीय समाजावर होत आहे. दिल्ली ही जगातील बलात्कारांची राजधानी बनली आहे.

इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानमधील बॉलिवूडचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी तुर्कीची ब्लॉकबस्टर मालिका एरटरुल प्रसारित केली. ते पुढे म्हणाले, “आम्ही हिंदुस्थानातील विध्वंस पाहिले आहेत. आपल्या देशात हा नाश नको आहे. जेव्हा पाकिस्तानच्या अधिकृत टीव्ही वाहिन्यांवरून मला एरटरुल प्रसारित झाले तेव्हा लोक म्हणाले की पाकिस्तानात लोक फक्त बॉलिवूड पाहतात.” परंतु माझा असा विश्वास आहे की आपण अशा गोष्टी पाकिस्तानी लोकांना दाखवल्या पाहिजेत ज्यांचे इस्लामिक मूल्ये, इस्लामिक इतिहास आणि कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून ते पाहू शकतात. लोक त्यांच्या संस्कृतीशी जवळीक साधून त्याची नैतिक मूल्ये शिकू इच्छित आहेत. जेव्हा जेव्हा समाजात अश्लीलता वाढत जाते तेव्हा गुन्हे वाढतात आणि आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे. ”

भविष्यात पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही बलात्कार करणार्‍यांना मोठ्या शिक्षेची भाषा केली. गंभीर लैंगिक गुन्हेगारांना चौकात फाशी देण्यात यावी. ते मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे जीवन खराब करतात. अशी बरीच प्रकरणे नोंदली गेलेली आहेत. तथापि, नंतर इम्रान खान म्हणाले की बलात्कार करणार्‍यांना सार्वजनिकपणे फाशी देणे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य नाही आणि असे केल्याने युरोपियन युनियनकडून पाकिस्तानला देण्यात आलेला विशेष दर्जा काढून टाकला जाऊ शकतो.

इम्रान खान म्हणाले की, हायवे बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे कारण लोकांना असे वाटते की आपल्या पत्नी आणि मुलींसोबत असे होऊ शकते. इमरान खान म्हणाले की, एखाद्या व्यक्तीवर लैंगिक छळाच्या अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असेल तर त्याचा रेकॉर्ड स्वतंत्र ठेवावा.