बलात्काऱ्याला आता नपुंसक बनवणार, पाकिस्तानात कठोर कायद्याला मंजुरी

पोलीसनामा ऑनलाईनः पाकिस्तान सरकारने बलात्काराविरोधात आता कठोर कायदा केला आहे. बलात्कार प्रकरणाची तातडीने सुनावणी करणे तसेच कठोर शिक्षा देण्याची तरतूद या काद्यात केली आहे. इतकेच नाही तर दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुंसक बनवण्याचा उल्लेख या कायद्यात आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी (दि. 15) पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी या नव्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे.

नव्या कायद्यामध्ये बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात सहभागी असणाऱ्यांचे नॅशनल रजिस्टर तयार केले जाणार आहे. यासोबतच पीडितेची ओळख गुप्त ठेवण्याचाही निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती भवनाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून या नव्या अध्यादेशांतर्गत बलात्कार प्रकरणांची लवकर सुनावणी व्हावी यासाठी देशभरात विशेष न्यायालय उभारली जाणार आहेत. चार महिन्याच्या आत प्रकरणाचा निकाल लावण्यात येणार आहे.