‘कंगाल’ PAK चे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताला दिली अण्वस्त्र हल्ल्याची धमकी, म्हणाले – ‘मुस्लिमांचं होणार नाही नुकसान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताविरूद्ध अणूबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. शेख रशीद म्हणाले, पाकिस्तानकडे अणूबॉम्ब आहे, ज्याची क्षमता आसामपर्यंत आहे. या अणू हल्ल्यात मुस्लिमांचे कोणतेही नुकसान होणार नाही. शेख रशीद यांनी म्हटले, जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर ते हिंसक आणि शेवटचे युद्ध असेल. भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला, तर कन्व्हेन्शन वॉरची कोणतीही शक्यता असणार नाही. आमचे शस्त्र मुस्लिमांचा जीव वाचवत आसामपर्यंत टार्गेट करू शकते.

शेख रशीद यांनी अशी हास्यास्पद धमकी प्रथमच दिलेली नाही, यापूर्वी सुद्धा अनेकदा असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी भारताचे नाव न घेता अणूयुद्धाची धमकी दिली होती. शेख रशीद यांनी म्हटले होते, आता युद्ध पारंपारिक पद्धतीने होणार नाही, तर अणूयुद्ध होईल. एका प्रश्नाला उत्तर देताना शेख रशीद यांनी म्हटले, आता असे युद्ध होणार नाही की, 4-6 दिवसांपर्यंत टँक, तोफा चालतील, तर थेट अणूयुद्ध होईल.

शेख रशीद यांनी म्हटले होते की, पाकिस्तानकडे सव्वाशे ग्रॅम, अडीचशे गॅम आणि पाचशे ग्रॅमचे सुद्धा अणूबॉम्ब आहेत, जे एखाद्या खास टार्गेटवर मारा करू शकतात. भारताने ऐकावे की, पाकिस्तानकडे पाव आणि अर्धा किलोचे सुद्धा अणूबॉम्ब आहेत, जे एखाद्या परिसराला टार्गेट करू शकतात. शेख रशीद यांची अशी मजेशीर वक्तव्य सोशल मीडियावर सुद्धा खुप वायरल होत असतात. अशी वक्तव्य करून ते आपलीच खिल्ली उडवत असतात.

राम मंदिरावर केले वक्तव्य
शेख रशीद यांनी राम मंदिर भूमीपूजनावर म्हटले होते की, भारत आता धर्मनिरपेक्ष देश राहिला नाही, तर एका धर्माचा देश झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भारताने कठोर उत्तर दिले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, जो देश दहशतवाद पसरवतो, तो अशी धार्मिक वाद वाढवणारी वक्तव्यच करू शकतो.