आभिनंदनच्या सुटकेबाबत पाकिस्तान तडजोडीस तयार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानात अडकलेला भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्थमान हे सुखरूप मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्थमान यांच्या सुटका करण्याबाबत भारतासोबत खुल्या दिलाने तडजोड करायला तयार आहे. असे वक्तव्य त्यांनी पाकिस्तानी प्रसार माध्यमांशी बोलतांना केले असल्याचे वृत्त आले आहे.

भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या F-१६ या विमानाला पिटाळून लावताना भारताचे MiG-२१ हे लढाऊ विमान कोसळले होते. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हा त्या विमानाचा पायलट होता. त्यावेळी विमान कोसळल्यानंतर तो पाकिस्तानच्या हद्दीत उतरला आणि त्याला बुधवारी पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय विंग कमांडरची तातडीने आणि सुरक्षित सुटका करण्यात यावी अशी मागणी भारताने केली आहे. पाकिस्तानी लष्कराने ज्या बिभत्सपणे त्या जखमी पायलटचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे, त्यावरही भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, यासंदर्भात परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळले की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू असे वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पाकिस्तानी प्रसार माध्यमांशी बोलतांना केले आहे.