‘पाकची नांगी वाकडीच’ ; म्हणे, मसूदला काळया यादीत टाकू पण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसुद अझहरला जागतिक दहशतवाद्यांच्या काळया यादीत टाकण्याची मागणी भारत गेली अनेक वर्षे करीत आहे. भारताच्या या मागणीला पाकिस्तानने पहिल्यांदाच तयारी दाखवली आहे. पण पाकने यासाठी एक अट ठेवली आहे. याबाबतच माहिती पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे.

काय आहे पाकिस्तानची अट

मसूदला काळ्या यादीत टाकायला तयार आहे मात्र भारताने पुलवामा हल्ल्याचा पुरावा द्यायला हवा तरच आणि काही बोलू शकतो असे मोहम्मद फैसल यांनी स्पष्ट केले आहे. एका पाकिस्तानी टीव्ही शो मध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले ” पुलवामा हल्ला हा वेगळा विषय आहे. भारताने जम्मू- काश्मीरमध्ये सुरू असलेली चळवळ दडपण्याचा प्रयत्न चालवला आहे, हे पाकिस्तानने वारंवार सांगितलं आहे”, असंही फैसल म्हणाले.

कोण आहे मसूद अझहर ?

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मसूद अझहर हा याच दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारताविरुद्ध कारवाया करणे आणि पाकिस्तानमधील तरुणांची माथी भडकाविण्याचे काम मसूद अजहर गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अजहरचं नाव पहिलं आहे.

मसूद अझहरचे शिक्षण कराची येथील जमिया उलूम अल इस्लामिया येथे झाले. त्यानंतर तो हरकत-उल अंसार या संघटनेत सामील झाला. त्याला पहिल्यांदा १९९४ मध्ये त्याला दहशतवादी कारवाया प्रकरणी श्रीनगरमध्ये अटक केली होती.

जैश-ए-मोहम्मदची स्थापना – नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्ली येथे जात असलेल्या विमानाचे दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर, १९९९ रोजी अपहरण केले होते. त्यात १८० प्रवाशी होते. या प्रवाशांच्या मुक्ततेसाठी अटल बिहारी वाजपेयी सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मसूद अझहरसह तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. सुटकेनंतर त्याने पाकिस्तानमधील कराचीत ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेची स्थापना १९९९ मध्ये केली होती.

संसदेवर हल्ला – जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेच्या स्थापनेच्या वर्षभरातच २००१ मध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना १३ डिसेंबरला लष्कर- ए- तैय्यबा आणि जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ५ दहशतवाद्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जखमी झाले. भारतीय संसदेवरील हल्ल्यानंतर अजहरला पाकिस्तानमध्ये अटक केली होती. पण कुठलाही पुरावा नसल्याच्या कारणावरून लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २००२ मध्ये त्याची सुटका करण्यात आली.

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत प्रयत्नशील –

मसूद अझहर हा पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. तो पाकिस्तानमध्ये राहून दहशतवादी कारवाया करत आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. चीनकडून मात्र याला विरोध होत आहे.त्याच्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) अंतर्गत प्रतिबंध घालण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने याआधीच दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा बंदी असलेल्या संघटनांच्या यादीमध्ये समावेश केला आहे. मात्र, या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर अद्याप बंदी न घालता पुलवामा हल्ल्याचे पुरावे देण्याची अट पाकने ठेवली आहे.