चीन समोर पाकिस्ताननं हात जोडले, कर्जाच्या परताव्यासाठी अटी ‘शिथिल’ करण्याबाबत केली विनंती, जाणून घ्या किती आहे कर्ज

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आर्थिक मंदी आणि कोरोना विषाणूला बळी पडल्याने पाकिस्तानने चीनला 30 अब्ज डॉलर (2,10,000 कोटी भारतीय रुपये) परत करण्याची अट शिथिल करण्याची विनंती केली आहे. चीनने पाकिस्तानला हे कर्ज चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर (सीपीईसी) च्या अंतर्गत वीज प्रणालीसाठी दिले आहे. सीपीईसी दोन्ही देशांना रस्ते आणि रेल्वेने जोडणारा प्रकल्प आहे. या अंतर्गत उर्जा प्रकल्पही उभारले जात आहेत. हा कॉरिडोर चीनच्या झिनजियांग प्रांतापासून पाकिस्तानमधील ग्वादर बंदरापर्यंत आहे. हे बंदर अरबी समुद्राच्या काठावर बांधले गेले आहे.

या प्रकल्पामुळे चीनला आपला माल पश्चिम आशियातील देशांकडे पाठवणे सोपे झाले आहे. 2015 मध्ये चीनचे अध्यक्ष शी चिनफिंग पाकिस्तान दौर्‍यावर आले तेव्हा हा प्रकल्प सुरू झाला होता. या प्रकल्पांतर्गत चीनने पाकिस्तानमध्ये होत असलेल्या कामांवर 50 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. आता या कर्जाचा काही भाग परत करण्याच्या संदर्भात इमरान खान सरकारने चीनला कर्ज परतफेड करण्याच्या अटी सुलभ करण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे.

पाकिस्तानमधील इतर काही वीज उत्पादकांकडूनही आवश्यक वीज खरेदी केली जाते. पाकिस्तानवर उर्जा देय बाबत सुमारे 11 अब्ज डॉलर्सची थकबाकी असून त्यात थकीत देयके आणि सीपीईसीच्या उर्जा प्रकल्पाच्या कर्जाचा समावेश आहे. यामुळे पाकिस्तान सरकार अडचणीत सापडले आहे. एवढी रक्कम त्यांच्या तिजोरीतही नाही. पाकिस्तानने आपली समस्या चीनच्या राजकीय नेतृत्वापर्यंत पोहोचवली तेव्हा त्यांनी चीनच्या राष्ट्रीय विकास व सुधारणा आयोग (एनडीआरसी) शी बोलण्याचा सल्ला दिला.

एनडीआरसी ही सरकारच्या अधीन कार्यरत असणारी संस्था आहे. आता सीपीईसी आणि एनडीआरसी चा संयुक्त कार्य गट यासंदर्भात चर्चा करेल. पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांच्या नुकत्याच झालेल्या चीन दौर्‍याचा मुख्य हेतू म्हणजे कर्जाच्या परतफेडीत थोडा दिलासा मिळवणे हा देखील होता, अशी माहिती समोर येत आहे. उल्लेखनीय आहे की पाकिस्तानला चालू वर्षात चीनला कर्ज परतफेडीचा हप्ता म्हणून 3.5 अरब डॉलर (सुमारे 25 हजार कोटी भारतीय रुपये) देणे आहेत. अश्या मोठ्या रकमेची परतफेड करणे पाकिस्तानला फार कठीण आहे.