‘कंगाल’ पाकिस्तानचं भारताविरूध्द षडयंत्र सुरूच, झाकीर नाईकच्या मदतीसाठी पुढं सरसावतोय

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – भारताविरुद्ध पाकिस्तानने रचलेले अनेक कट कारस्थान देशातील गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दलाने उलथवून लावले आहेत. मात्र, खायचे वांदे असलेल्या पाकिस्तानने भारताविरोधात आपल्या कुरापती करण्याचं थांबवलं नाही. आता पाकिस्तान भारताचा फरारी इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक याच्यासाठी इस्लामिक देशांकडूक निधी गोळा करण्यास मदत करत असल्याचं समोर आलं आहे.

सध्या मलेशियात वास्तव्यास असलेला भारतातील फरार, इस्लामिक प्रचारक आणि कट्टरपंथी झाकीर नाईक अजूनही कट्टरपंथी कारवायांना चालना देण्याचे प्रयत्न करतोय. जे त्याच्या कामाला पाठिंबा देतात, त्यांच्याकडून तो जगभरातून निधी गोळा करत आहे. त्याच्या या कामात त्याला पाकिस्तानकडून सहकार्य लाभत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान नाईकसाठी निधी गोळा करण्यासाठी तुर्की आणि कतारसोबत आपले संबंध वापरत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, झाकीर नाईकने कतारामधील असलेला आपला जुना साथीदार अब्दुल्ला अली अल यांच्याकडे जात त्याच्या धर्मदाय संस्थांसाठी ५ लाख डॉलरची मागणी केली होती. तसेच कतार मधील एक जुना सहयोगी नाईकला कतार व्यापारी आणि धर्मदाय संस्थाकडून निधी गोळा करून देण्यास मदत करत आहे. यासाठी नाईकने कतार आणि युएईसह अनेक आखाती देशात बँक खाती उघडल्याचं समोर येत आहे. यापद्धतीने तो त्याच्या सहयोगी आणि नेटवर्ककडे निधी हस्तांतरित करत असतो.

ढाका येथील बेकरीवर जुलै २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झालेला. त्या प्रकरणी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी जबाबात म्हटलं होत की, त्यांना नाईक यांच्या शिकवणीने प्रेरणा मिळाली, त्यानंतर नाईक गुप्तचर यंत्रणांच्या रडारवरती आला. नाईकच्या पीस टीव्हीवर भारत आणि बांगलादेशात बंदी घालण्यात आली. तसेच नाईकवर मनी लाँड्रिंग आणि द्वेष पसरवणारी भाषणे दिल्याचा आरोप आहे.