PAK : न्यायाधीशांविरूद्ध बोलणे न्यूज अँकरला पडले भारी; चॅनेल बंद, लागला 10 लाखांचा दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीच्या अँकरला तेथील न्यायाधीशांविरूद्ध बोलणे भारी पडले आहे. न्यायाधीशांचा अपमान केल्याच्या आरोपावरूनच हे चॅनेल 30 दिवसांसाठी बंद केले गेले आहे. पाकिस्तानच्या मीडिया मॉनिटरिंग सोसायटीने ही कारवाई केली आहे. बोल टीव्ही असे या चॅनेलचे नाव आहे. माहितीनुसार, चॅनेल केवळ 30 दिवसांसाठीच बंद पडलेले नाही तर 10 लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. इतकेच नाही तर या काळात वाहिनीचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.

बोल टीव्ही अँकर सामी इब्राहिमवर 13 जानेवारी रोजी लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत आपल्या कार्यक्रमात अपमानजनक बोलल्याचं आणि न्यायाधीशांच्या विरोधात बोलण्याचा आरोप होता. चॅनेलविरूद्ध केलेल्या कारवाईबाबत पाकिस्तानचे मीडिया मॉनिटरिंग संस्था PEMRA ने सांगितले की, अँकरने घटनेच्या अनुच्छेद 68 आणि पेमरा आचारसंहिता 2015 च्या कलम 19 चे उल्लंघन केले आणि न्यायाधीशांविरूद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. दरम्यान, या प्रकरणात चॅनेलला यापूर्वीच नोटीस पाठविली गेली होती आणि माफी मागण्यास सांगितले गेले होते. परंतु चॅनेल आपल्या स्टॅन्डवर ठाम राहिला. याउलट, चॅनेलने संस्थेकडून नोटीस मागे घेण्याची मागणी केली ज्यानंतर पेमराने चॅनेलविरूद्ध ही कारवाई केली. चॅनेलला 30 दिवसांसाठी पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आले आहे.

दरम्यान, बोल टीव्हीवर या कारवाईस कारणीभूत ठरलेला अँकर यापूर्वीही वादात होता. एका कार्यक्रमादरम्यान सामी इब्राहिमने तेथे उपस्थित असलेले विज्ञानमंत्री फवाद चौधरी यांच्यावर पंतप्रधान इम्रान खानविरूद्ध कट रचल्याचा आरोप केला आणि त्यानंतर फवाद चौधरी यांनी रागाच्या भरात पत्रकाराला चापट मारली.