काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद केल्यानंतर टोमणे मारणार्‍या PAK नं आता काही शहरात केली ‘नेट’ सेवा बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर काही काळासाठी तेथील इंटरनेट सेवा भारताने बंद ठेवली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारताच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. मात्र आता तीच वेळ पाकिस्तानवर आली आहे पाकिस्तानमध्ये सर्व प्रकारच्या इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद ठेवल्याची बातमी समोर आली आहे. मंगळवारी मोहरमपूर्वी पाकिस्तानने इस्लामाबाद, कराची, रावळपिंडी आणि पेशावरसह देशाच्या विविध भागात इंटरनेट सेवा बंद केली आहे.

पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार शिया मुस्लिम आपला मोहरमचा सर्वात महत्वाचा सण पार पाडतील, त्यावेळी मोबाइल फोन सेवा आणि इंटरनेट बंद राहील. सोमवारी – मंगळवारी मोबाइल फोन सेवा आणि इंटरनेट सेवा बंद राहतील. एवढेच नव्हे तर या निमित्ताने पाकिस्तानच्या काही भागातील सुरक्षा देखील वाढविण्यात येणार आहे.

पीटीएने मात्र अद्याप या बंदीसाठी नेमका वेळ जाहीर केलेला नाही. परंतु सकाळपासून ते संध्याकाळी सहापर्यंत सेवा बंद ठेवल्याचा दावा केला गेला आहे. विशेषत: ज्या भागातून मोहरम मिरवणूक निघेल त्या भागात या सेवा विस्कळीत होतील.

रस्त्यांवर सुरक्षा यंत्रणा वाढवली
पीटीए अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जास्तीत जास्त सुरक्षा मिळावी यासाठी ऐतिहासिकदृष्ट्या मोबाईल फोन सेवा बंद करण्याच्या सूचना अंतिम क्षणी जारी केल्या आहेत. इस्लामाबाद, कराची, रावळपिंडी आणि पेशावर अशा मोठ्या शहरांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर या भागातील मोहरमच्या मिरवणूकी मार्गांवर हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.