पुलवामाच्या वर्षपुर्ती दिवशीच पाकिस्तानकडून पूंछमध्ये गोळीबार, एक नागरिक ठार

दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्याची आज वर्षपूर्ती असतानाच पाकने पूंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य चारजण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैन्यांनी जशास तसं उत्तर दिले आहे. पाकने केलेल्या गोळीबारामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.

पुलवामामध्ये मागील वर्षी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांची बस उडवली होती. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज भारतात आदरांजली वाहण्यात येत असताना पाकने मात्र पूंछभागात गोळीबार केला. यापूर्वी पाकिस्तानने 8 फेब्रुवारीला गोळीबार केला होता. या गोळीबारात एका जवान शहीद झाला होता. मात्र, याची अधिकृत माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आलेली नाही.

भारत – पाक तणाव वाढण्याची शक्यता
तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यब पाकिस्तान दौऱ्यावर येणार असून पाकिस्तानसाठी काश्मीर जेवढं महत्त्वाचं आहे तेवढेच तुर्कीसाठी असे वादग्रस्त विधान तय्यब एर्दोगान यांनी केले होते. त्यातच आता पाकिस्तानच्या सैन्यांनी पूंछमध्ये गोळीबार केल्याने भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढू शकतो. तर भारत पुढील काही दिवसांत लष्करी कारवाई करू शकतो असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आएशा फारूकी यांनी गोळीबाराच्या अगोदर म्हटले. मात्र, त्याच्या वक्तव्याचे ठोस कारण त्यांनी दिले नाही. तसेच भारताने कोणतीही कारवाई केली तर पाकही त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल असे त्यांनी म्हटले आहे.

You might also like