अर्थव्यस्था सुधारण्यासाठी पाकिस्तान घेणार चक्क गाढवांची मदत

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारताचा शेजारील देश म्हणजे पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. पाकिस्तानमधील परदेशी चलन अगदी संपुष्टात येण्याचे चित्र आहे. परदेशातून घेतलेल्या कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे परदेशी चलनाचा तुटवडा, अशा दुहेरी आर्थिक कात्रीमध्ये पाकिस्तान सापडला आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकिस्तान चक्क गाढवांची मदत घेणार आहे.

गाढवांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता परदेशी चलन मिळवण्यासाठी पाकिस्तान गाढवांची निर्यात करणार आहे. पाकिस्तान चीनला गाढवे विकण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळत आहे.

चीनमधील कंपन्यांना पाकिस्तानमधील गाढवांच्या व्यापारामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. जीओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार यासाठी चीनी कंपन्या ३०० कोटी गुंतवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. देशाला परदेशी चलन मिळवून देण्यासाठी पाकिस्तानमधील पशु विभागाने वेगळ्या प्रजातीच्या गाढवांची पैदास करण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती चीनमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पशु अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इस्माइल खान आणि मानसेरा येथे निर्यात करता येणाऱ्या गाढवांची पैदास करण्यासाठी केंद्र स्थापन केली आहेत. परदेशी कंपन्यांच्या मदतीने ही केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. पहिल्या तीन वर्षांमध्ये पाकिस्तानने ८० हजारहून अधिक गाढवं चीनमध्ये निर्यात करण्याचे उदिष्ट ठेवले आहे, अशी माहिती तेथील प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

चीनमध्ये गाढवांना खूप मागणी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चीनमध्ये पारंपारिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या औषधांमध्ये गाढवांच्या अवयवांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. गाढवाच्या कातडीपासून बनवण्यात येणाऱ्या जीलेटीनचा वापर चीनमध्ये औषध म्हणून केला जातो. जीलेटीन वापरुन बनवण्यात येणाऱ्या औषधांचा वापर रक्त शुद्धीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. त्यामुळेच पाकिस्तान आता गाढवे चीनला निर्यात करणार आहे.

तेव्हा ‘ते’ पाप न करण्याचं आश्वासन आईनं घेतलं होतं; नरेंद्र मोदींचा खुलासा