चीनमध्ये बनलेल्या लसीची पाकिस्तानमधील 10 हजार लोकांवर होणार तिसऱ्या टप्प्यातील चाचणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वजण लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जगातील अनेक औषध कंपन्या मनापासून लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनी कंपनी कॅन्सिनो बायोलॉजिक्सही यात सहभागी आहे. त्यांनी तयार केलेल्या लसीच्या तिसर्‍या टप्प्याची चाचणी सुरू झाली आहे. या चाचणीत सात देशांतील ४० हजार लोक सहभागी होतील. यात १० हजार लोक पाकिस्तानचे असतील.

कॅन्सीनो कंपनीने तयार केलेल्या लसीला एडी५-एनसीओव्ही असे नाव देण्यात आले आहे. याच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरु करण्याची परवानगी पाकिस्तान सरकारने ऑगस्ट महिन्यातच दिली होती. आता पाकिस्तानचे नियोजन मंत्री असद उमर यांनी चाचणी सुरू करण्याची घोषणा केली.

पाकिस्तानमधील कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशाच्या सैन्याच्या कारवाईचे निरीक्षण व व्यवस्थापन करण्याचे काम उमर हेच करत आहेत. चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यातील प्राथमिक निकाल चार ते सहा महिन्यांत येण्याचे अपेक्षित असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले.

इस्लामाबादच्या ज्या रुग्णालयात ही चाचणी सुरू झाली आहे, तेथील डॉक्टरांना आशा आहे की, दररोज २० ते २५ लोक चाचणीसाठी येतील. येत्या काही दिवसांत ते इतर शहरांतील रुग्णालयातही नेण्याची त्यांची योजना आहे. या चाचणीचे नेतृत्व करणारे हसन अब्बस झहीर म्हणाले की, आमची टीम पोचली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितले की, चाचणीत भाग घेण्यासाठी बरेच लोक पुढे आले आहेत आणि हे खूप उत्साहवर्धक आहे.

ज्या इतर देशांमध्ये चिनी लसीच्या चाचण्या होत आहेत, त्यात अर्जेंटिना, चिली, चीन आणि रशिया यांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, लसीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी मे आणि जूनमध्ये झाली होती आणि त्याचा परिणाम उत्साहवर्धक आहे. पाकिस्तानमध्ये जून महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले, जेव्हा एका दिवसात नवीन प्रकरणांची संख्या सहा हजारांवर पोचली होती. पण त्यानंतर नवीन प्रकरणांमध्ये बरीच घट झाली आहे. मंगळवारी केवळ ५८२ नवीन प्रकरणे आढळली. अशाप्रकारे पाकिस्तानमध्ये आता कोरोनाची प्रकरणे ३०६,८८६ वर गेली आहेत, तर या विषाणूमुळे मृतांचा आकडा ६,४२४ आहे.

पाकिस्तानची एकूण लोकसंख्या २२ कोटी आहे. सध्या येथे दररोज २० हजार ते ३६ हजार चाचण्या होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. मात्र विश्लेषकांचे म्हणणे आहे की, याचा शोध लावणे अद्याप बाकी आहे कि संसर्ग प्रकरणात घट होण्याचे खरे कारण काय आहे, कारण पाकिस्तानसारख्या देशातील लोक सावधगिरी बाळगण्यावर जास्त लक्ष देत नाहीत. या महिन्यापासून पाकिस्तानमध्ये हळूहळू शाळा उघडल्या जात आहेत. पण सिनेमा, थिएटर आणि जलतरण तलाव अजूनही बंद आहेत.