राजौरीत पाकिस्तानकडून गोळीबार, भारताचा 1 जवान शहीद

जम्मू : वृत्तसंस्था-  काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. तसेच पाकिस्तानकडून भारताच्या दिशेनं मोर्टार डागण्यात आले. या मध्ये भारतीय लष्कराचा नायक अनिश थॉमस हा जवान शहीद झाला आहे.तसेच १ अधिकारी आणि २ जवानसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. सेनेकडून मिळालेल्या माहितीनुसार,राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये हा गोळीबार करण्यात आला होता. भारतीय लष्कराने त्या गोळीबाराला चांगलेच प्रत्यूत्तर दिले आहे.

कोणत्याही चिथावणीविना शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाकिस्तानकडून हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात भारतीय सेनेच्या एका अधिकाऱ्यासह ३ जवान जखमी झाले होते. यातील अनिश थॉमस या गंभीररित्या जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झाला. तर इतर जखमींवर अजूनही उपचार सुरु आहेत. भारताकडून करण्यात आलेल्या प्रत्यूत्तराचा फटका पाकिस्तालासुद्धा बसला आहे. पाकिस्तानचे काही जवान या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आहे. परंतु याबद्दल अजून सविस्तर वृत्त मिळाले नाही आहे.