पाकिस्तान सैन्याकडून सीमेवर पुन्हा गोळीबार, सीमेवर तणाव

जम्मू : वृत्तसंस्था – जम्मू- काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेला लागून असलेल्या नौशेरा सेक्टरमध्ये पाक सैन्याने आज पुन्हा गोळीबार केला. पूँछ जिल्ह्यात सीमेलगत असलेल्या दोन ठिकाणांवरही पाक सैन्याने गुरूवारी गोळीबार केला होता. सीमेलगत असलेल्या अनेक भागांमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या आठ दिवसांपासून सतत गोळीबार सुरु आहे. यामुळे सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यात पाक सैन्याने पूँछ आणि राजौरीमध्ये केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने उत्तर दिले. या कारवाईत पाक सैन्याची सात ठाणी उद्धवस्त करण्यात आली होती. तसेच पाकचे अनेक सैनिक ठार झाले. या कारवाईनंतर पाक सैन्यांकडून नियंत्रण रेषेवर इतर ठिकाणी गोळीबार करण्यात येत आहे.

आज पाकिस्तान सैन्याने नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या ठिकाणावर मोर्टारने हल्ला केला. यानंतर भारतीय जवानांनीही त्यांना दणक्यात उत्तर दिले. पाककडून सीमेवर सुरू असलेल्या गोळीबाराच्या आड भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे भारतीय लष्कराच्या जवानांना सीमेवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेलगत आघाडीवर असलेल्या भारतीय लष्कराच्या चौक्या आणि सीमावर्तीत भागातील गावांना गोळीबाराचे लक्ष करण्यात आले आहे. यात आत्तापर्यंत भारताची कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण मागील आठवड्यात पाक सैन्याने पूँछमध्ये नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान आणि एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता.