PAK : महिलेनं स्वत:ला ‘मृत’ घोषित करून ‘विमा’ कंपनीकडून घेतले 11 कोटी; 9 वर्षांनंतर झालं उघड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पैसे कमावण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी लोक काय काय नाही करत, पण एका महिलेने पाकिस्तानमध्ये जे केले ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. विमा पॉलिसीचे पैसे घेण्यासाठी महिलेने स्वत:ला मृत असल्याचे सिद्ध केले. इतकेच नाही तर असे करण्यात ती यशस्वीदेखील ठरली आणि तिला 11 कोटी रुपये (भारतीय चलनानुसार) देखील मिळाले. आता पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

खरं तर, महिलेने फसवणूक करत स्वत:ला मृत घोषित केले आणि तिच्या मुलांनी 1.5 मिलियन डॉलर्स किमतीच्या दोन जीवन विमा पॉलिसींवर दावा केला. आता विमा अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सीमा खर्बे नावाच्या महिलेने 2008 आणि 2009 मध्ये अमेरिकेचा दौरा केला आणि तिच्या नावे दोन जीवन विमा पॉलिसी खरेदी केल्या.

2011 मध्ये या महिलेने एका डॉक्टरसह पाकिस्तानमधील काही स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली आणि तिच्या नावे मृत्यू प्रमाणपत्र जारी करून घेतले. महिलेला कुठे पुरण्यात आले, हेदेखील या कागदपत्रात नमूद केले आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, प्रमाणपत्र वापरून तिच्या मुलांनी 1.5 मिलियन डॉलर्स (सुमारे 23 कोटी पाकिस्तानी रुपये) किमतीची दोन जीवन विमा पॉलिसी भरल्याचा दावा केला.

मृत घोषित झाल्यानंतरही या महिलेने कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून किमान 10 वेळा परदेश दौरा केला. एअरलाइन्स कंपनीनेही कबूल केले की, ते फसवणूक ओळखण्यात सक्षम नव्हते. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी महिलेने ‘पाच देशांना भेट दिली, पण प्रत्येक वेळी ती घरी परतली. एफआयए मानव तस्करी सेलने आता महिला, तिचा मुलगा व मुलगी आणि काही स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामध्ये एका डॉक्टरचादेखील समावेश आहे. अधिकारी म्हणाले, “अमेरिकन अधिकाऱ्यांनी आम्हाला या महिलेबद्दल सतर्क केले आणि आम्ही या फसवणुकीचा व्यापक तपास सुरू केला.”