महाबळेश्वरच्या हॉटेलमध्ये पाकिस्तानी नागरिक, पोलिसांकडून मालक व व्यवस्थापवर FIR

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असताना त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असताना ती न दिल्याने महाबळेश्वर येथील हॉटेल पार्क यार्ड च्या हॉटेल मालक व व्यवस्थापका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेल मालक तबरेज इकबाल सय्यद (वय ४३) व व्यवस्थापक फारूक हशम वारुणकर (वय ४६ रा. महाबळेश्वर) यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हॉटेल पार्क यार्डमध्ये रहिमतुल्ला नदीम ईस्माईल (वय ३३, रा. ए टी चांदणी चौक, कराची, पाकिस्तान) हा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास होता. पोलीस हवालदार आर. बी. मोरमारे यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

महाबळेश्वर शहराजवळ असलेल्या ‘द पार्क यार्ड’ या रिसॉर्टमध्ये २७ जुलै पासून रहिमतुल्ला नदीम ईस्माईल हा पाकिस्तानी नागरिक रूम नंबर २१२ मध्ये वास्तव्यास होता. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. दरम्यान परकीय नागरिक वास्तव्यास असल्यानंतर त्याची माहिती हॉटेल मालक व व्यवस्थापकांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यास २४ तासांमध्ये कळविणे बंधनकारक होते. मात्र दोन दिवस त्याला हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेऊन त्याची माहिती ‘सी फॉर्म’ भरून पोलिस ठाण्यास अथवा पोलीस अधीक्षक कार्यालयाला न दिल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. त्यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात भादंवी १८८ सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त